32.5 C
Latur
Thursday, May 15, 2025
Homeमहाराष्ट्रमराठा आंदोलक तिस-या दिवशीही आक्रमक

मराठा आंदोलक तिस-या दिवशीही आक्रमक

- अनेक ठिकाणी चक्काजाम आंदोलन - एसटी सेवा बंद, नागरिकांचा खोळंबा

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीवर सरकारकडून देण्यात आलेल्या अध्यादेशावर अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे. मागणी मान्य होत नसल्याने राज्यभर अनेक जिल्ह्यांत मराठा बांधव आक्रमक झाले आहेत. गेल्या तीन दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. यामुळे सामान्य नागरिकांचे हाल होत आहेत.

लातूरमध्ये मराठा समाजाच्या वतीने सलग तिस-या दिवशी देखील चक्काजाम आंदोलन करण्यात आले आहे. आंदोलनादरम्यान माजी आमदार दिनकर माने यांची गाडी मराठा तरुणांनी अडवली. संतप्त मराठा तरुणांनी गाडीच्या समोर झोपत निषेध व्यक्त केला आहे. तसेच लातूर-सोलापूर महामार्ग मराठा तरुणांनी अडवला आहे. यावेळी त्यांनी गर्दीतून वाट काढत रुग्णवाहिकेला रस्ता दिला.

एसटी सेवा बंद, ८० लाखांचे नुकसान
नांदेड जिल्ह्यात आजही एसटी बससेवा बंद आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी ठिकठिकाणी आंदोलनं होत असून रस्ते अडवले जात आहेत. त्यामुळे एसटी सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. शुक्रवारी लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. तर काल सकाळपासून संपूर्ण जिल्ह्यात एसटी बससेवा बंद करण्यात आली आहे.
पोलिस प्रशासनाच्या आदेशानुसार एसटी सेवा सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान गेल्या दोन दिवसांत नांदेड जिल्ह्यात एसटी महामंडळाचे ८० लाखांचे नुकसान झाले आहे.

२१ तारखेनंतर आंदोलनाची दिशा
दरम्यान, महाराष्ट्रभर सुरू असलेले आंदोलन शांततेत करावे. आंदोलनाबाबत आपण २१ तारखेनंतर दिशा ठरवणार आहोत, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. तसेच यावेळी आंदोलन करताना कुठलाच धर्म किंवा जात आडवी न येता सर्व दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रापर्यंत जाता येईल, त्यांना पोचता येईल, त्यांना कुठलाही त्रास होणार नाही, असे आंदोलन करण्याचे आवाहन जरांगेंनी आंदोलकांना केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR