24.6 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeराष्ट्रीयनीट परीक्षेत २३२१ विद्यार्थ्यांना ७०० हून अधिक गुण

नीट परीक्षेत २३२१ विद्यार्थ्यांना ७०० हून अधिक गुण

लातूर, नांदेड, अकोल्यातील विद्यार्थ्यांचा समावेश

नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर नॅशनल टेस्टिंग एजन्सीने केंद्र आणि शहरांनुसार नीट यूजीच्या गुणांची यादी ऑनलाइन जारी केली आहेत. यंदा नीट परीक्षेत मोठा बदल झाला आहे. यापूर्वी फक्त मोठ्या कोचिंग हबमधील विद्यार्थी टॉप करायचे, पण या वर्षी देशभरातल्या १४०४ केंद्रांमधून (२७६ शहरे आणि २५ राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये) एकूण २३२१ विद्यार्थ्यांनी ७००+ गुण मिळवले आहेत. या आकडेवारीवरुन असे दिसून येते की, आता छोट्या शहरांतील विद्यार्थीही मेहनत घेऊन मोठ्या शहरांतील विद्यार्थ्यांशी स्पर्धा करत आहेत.

लातूर, नागपूर, नांदेड, अकोला, कोल्हापूरमधील विद्यार्थ्यांनी केले टॉप हे खरे आहे की, कोटा, सीकर आणि कोट्टायम सारख्या प्रसिद्ध कोंिचग सेंटरमधील विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली आहे, परंतु इतर सेंटरमधील विद्यार्थीदेखील चमकले आहेत. यंदा लखनौमधील(३५), कोलकाता(२७), लातूर (२५), नागपूर (२०), फरीदाबाद (१९), नांदेड (१८), इंदूर (१७), कटक आणि कानपूर (१६-१६), कोल्हापूर, नोएडा, साहिबजादा अजितसिंग नगर (१४-१४), आग्रा आणि अलीगढ (१३-१३), अकोला आणि पटियाला (१०-१०), दावणगेरे (८) आणि बनासकांठा (७) या शहरांमधील विद्यार्थ्यांनी ७०० हून अधिक गुण मिळवून आश्चर्यकारक कामगिरी केली आहे.

विशेष म्हणजे, ७०० पेक्षा कमी, पण चांगले गुण घेणा-या विद्यार्थ्यांमध्येही छोट्या शहरातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. ५०९ शहरे आणि ४०४४ केंद्रांमधील विद्यार्थ्यांनी ६५० ते ६९९ गुण, ५४० शहरे आणि ४४८४ केंद्रांमधील विद्यार्थ्यांनी ६०० ते ६४९ गुण, तर ५४८ शहरांमधील विद्यार्थ्यांनी ५५० ते ५९९ दरम्यान गुण मिळवले आहेत. महत्वाची बाब म्हणजे, यातील बहुतांश विद्यार्थी लहान शहरांमधील आहेत.

गेल्या वर्षीच्या तुलनेत चांगला निकाल
गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षीच आकडे बरेच चांगले आहेत. नीट २०२४ च्या तुलनेत नीट २०२३ चा निकाल काहीसा कमी होता. नीट २०२३ मध्ये, ७०० ते ७२० दरम्यान गुण मिळवणारे उमेदवार ११६ शहरे आणि ३१० केंद्रांमधील होते. तर, ६५० ते ६९९ दरम्यान गुण मिळवणारे उमेदवार ३८१ शहरे आणि २४३१ केंद्रातील होते. या बदलामुळे आता केवळ मोठ्या शहरांतील विद्यार्थ्यांनाच नव्हे, तर संपूर्ण देशातील हुशार विद्यार्थ्यांना वैद्यकशास्त्र शिकण्याची संधी मिळत असल्याचे दिसून येत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR