28.9 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रशरद पवारांमुळेच मराठा आरक्षण गेले

शरद पवारांमुळेच मराठा आरक्षण गेले

अमित शाह यांची टीका

पुणे : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये झालेल्या दारुण पराभवामुळे धक्का बसलेल्या भाजपाने विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजपाचे प्रदेश महाअधिवेशन पुण्यामध्ये होत आहे. या अधिवेशनामध्ये उपस्थित नेते आणि कार्यकर्त्यांना संबोधित करताना भाजपा नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून शरद पवार यांना टीकेचे लक्ष्य केले. महाराष्ट्रात जेव्हा जेव्हा भाजपाचे सरकार आले तेव्हा तेव्हा मराठा समाजाला आरक्षण दिले गेले. मात्र शरद पवार यांची सत्ता आल्यावर हे आरक्षण गायब केले गेले, अशी टीका अमित शाह यांनी केली. तसेच शरद पवार हे भ्रष्टाचा-यांचे सरदार आहेत, आरोपही अमित शाह यांनी केला.

सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा हा चांगलाच तापलेला आहे. त्या पार्श्वभूमीवर अमित शाह यांनी मराठा आरक्षणावरून शरद पवार यांना लक्ष्य केले. ते म्हणाले की, महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी वेगवेगळे संभ्रम पसरवण्यास सुरुवात केली आहे. मी आज शरद पवार यांना विचारू इच्छितो की, आमच्याकडून देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे सर्वजण बोलत आहेत. आता मी एक निरीक्षण नोंदवू इच्छितो, जेव्हा जेव्हा भाजपाचे सरकार येते तेव्हा मराठा समाजाला आरक्षण दिले जाते. मात्र जेव्हा जेव्हा शरद पवार सत्तेवर येतात तेव्हा मराठा आरक्षण गायब होते असे अमित शाह म्हणाले.

यावेळी अमित शाह यांना काँग्रेसवरही निशाणा साधला. ते म्हणाले की, काँग्रेसवाले खूप अपप्रचार करत आहेत. आम्ही गरीब, दलित, आदिवासींचे कल्याण करणार असे काँग्रेसकडून सांगण्यात येत आहे. मात्र मी आज हे विचारायला आलो आहे की, ५८ वर्षांपर्यंत तुमची सत्ता होती. या काळात तुम्ही गरिबांसाठी काय केले. महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवलेल्या मार्गावर चालणे दूर राहिले. यांनी त्यांचे विचार समाप्त करण्याचे काम केले. दहा वर्षांमध्ये गरीबांचे कल्याण करण्याचे काम हे भारतीय जनता पक्षाने केले आहे, असे अमित शाह म्हणाले.

आरक्षणाच्या मुद्यावर भूमिका मांडताना अमित शाह यांनी सांगितले की, मागच्या काही काळात खूप भ्रम पसरवले गेले. भाजप आरक्षण संपविणार असे सांगितले गेले. आम्ही उत्तर देण्यामध्ये संकोच करू लागलो. लोकांच्या मनात शंका निर्माण झाली. मात्र आज मी सांगू इच्छितो की, आरक्षणाला १० वर्षांची मुदतवाढ ही नरेंद्र मोदींचे पूर्ण बहुमताचे सरकार असतानाच दिली गेली. तसेच आरक्षणाला बळ देण्याचे कामही नरेंद्र मोदी यांनी केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR