27.5 C
Latur
Wednesday, February 19, 2025
Homeमहाराष्ट्ररेल्वेच्या माध्यमातून ‘मराठी साहित्ययात्री संमेलन’

रेल्वेच्या माध्यमातून ‘मराठी साहित्ययात्री संमेलन’

पुण्यातून दिल्लीला जाणा-या रेल्वेच्या बोगींना गडकिल्ल्याची नावे

पुणे : प्रतिनिधी
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या दिल्ली येथे होत असलेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने पुणे ते दिल्ली रेल्वे प्रवासादरम्यान फिरत्या चाकांवर प्रवासी साहित्य संमेलन भरवावे या संकल्पनेतून ‘मराठी साहित्ययात्री संमेलन’ आयोजित करण्यात आले आहे. मुख्य संमेलनानिमित्त रेल्वेत होणारे हे मराठीतील पहिलेच आणि जगातील सर्वात मोठे आणि दीर्घ साहित्य संमेलन असणार आहे.

साहित्यरसिकांना पुण्यातून दिल्लीला घेऊन जाणा-या रेल्वेच्या प्रत्येक बोगीला गडकिल्ले यांची नावे दिली जाणार आहेत. मराठी भाषामंत्री उदय सामंत या संमेलनाचे स्वागताध्यक्ष असून तेही ‘मराठी साहित्ययात्री संमेलनात’ सहभागी होत रेल्वेतून प्रवास करणार आहेत अशी माहिती सरहद, पुणेचे विश्वस्त डॉ. शैलेश पगारिया, अनुज नहार, महाराष्ट्र साहित्य परिदषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी पत्रकार परिषदेत सांगितली.

दि. २१ ते २३ फेब्रुवारी या कालावधीत दिल्लीतील छत्रपती शिवाजी महाराज साहित्यनगरी, ताल कटोरा स्टेडियम येथे हे संमेलन होत आहे. या संमेलनात सहभागी होणा-या साहित्य रसिकांसाठी पुणे ते दिल्ली अशी विशेष रेल्वे सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही विशेष रेल्वे दि. १९ रोजी दुपारी पुण्यातून निघणार असून दि. २० रोजी रात्री दिल्ली येथे पोहोचणार आहे. ‘मराठी साहित्ययात्री संमेलनात’ महाराष्ट्रातील विविध गावा-गावांमधून साहित्यिक, युवक, लोककलाकार, स्टँडअप कॉमेडियन्स, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स तसेच शाहिरी व भजनी मंडळांचा मोठ्या संख्येने समावेश असणार आहे.

मोठ्या प्रमाणावर तरुणाईच्या सहभागामुळे हे संमेलन तरुणाईचे संमेलन ठरणार आहे. महान सेनानी महादजी शिंदे यांचे नाव असलेल्या या विशेष रेल्वेला १६ बोगी असणार असून प्रवासारदम्यान प्रत्येक बोगीत विविध साहित्यिक-सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जाणार आहेत. युवा साहित्यिक व कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे या उद्देशाने ‘मराठी साहित्ययात्री संमेलन’ भरविण्यात येत आहे. दि. १९ रोजी असलेल्या शिवजयंतीचे औचित्य साधून सुरुवातीस छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ या महाराष्ट्र गीताच्या सामूहिक गायनानंतर पुण्यातून रेल्वे निघणार आहे.

तत्पूर्वी पुस्तक दिंडीही काढली जाणार आहे. याच रेल्वे प्रवासात १२०० पेक्षा अधिक साहित्यिक येणार असून जळगाव आणि ग्वाल्हेर येथे ही विशेष रेल्वे पोहोचल्यानंतर ग्वाल्हेर येथील स्थानिक नागरिक भव्य स्वागत करणार आहेत. रेल्वे दि. २० रोजी दिल्लीत पोहोचणार असून दिल्ली स्थानकावर पोहोचल्यानंतर पसायदानाच्या गायनाने ‘मराठी साहित्ययात्री संमेलना’ची व पहिल्या टप्प्यातील प्रवासाची सांगता होणार आहे. यावेळी दिल्लीतील मराठीजन मोठ्या संख्येने स्वागतासाठी उपस्थित राहणार आहेत. परतीच्या प्रवासात देखील हे संमेलन रंगणार असून दि. २५ रोजी पुणे रेल्वे स्थानकावर या अनोख्या संमेलनाची सांगता होईल. संमेलनाच्या निमित्ताने स्वतंत्र संयोजन समितीची स्थापना करण्यात आली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR