छत्रपती संभाजीनगर : उद्धवसेनेला लागलेली गळती थांबायला तयार नाही. मागील सप्ताहात माजी महापौर नंदकुमार घोडेल दाम्पत्याने शिंदेसेनेत प्रवेश केला. तेव्हापासून पक्षाची गळती रोखण्यासाठी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते आ. अंबादास दानवे यांनी बैठका आणि गाठीभेटी घेतल्या. शनिवारी पदाधिका-यांचा मेळावा आयोजित केला. दुसरीकडे मात्र, पक्षाचे मराठवाडा सचिव अशोक पटवर्धन यांनी शिंदेसेनेत प्रवेश केल्याने खळबळ उडाली. पटवर्धन हे खैरे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात.
विधानसभा निवडणूकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला जिल्ह्यात एकाही मतदारसंघात विजय मिळविता आला नाही. तेव्हापासून पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल सुरू आहे. गतसप्ताहात माजी महापौर नंदकुमार घोडेले आणि अनिता घोडेले यांनी शिंदेसेनेत प्रवेश केला. आणखी अकरा ते बारा माजी नगरसेवक आणि पदाधिकारी पक्षाला जय महाराष्ट्र करण्याच्या तयारी असल्याची कुणकुण पक्षाच्या नेत्यांना लागली. तेव्हापासून शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते आ. अंबादास दानवे यांनी पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांच्या गाठीभेटी आणि बैठका घेतल्या. शनिवारी पक्षाचा मेळावाही आयोजित केला. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी मराठवाडा सचिव अशोक पटवर्धन यांनी सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट, जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ आणि घोडेले यांच्या उपस्थितीत शिंदेसेनेत प्रवेश केला.