35.4 C
Latur
Monday, May 13, 2024
Homeमहाराष्ट्रमराठवाड्याचा पाणी प्रश्न पेटणार

मराठवाड्याचा पाणी प्रश्न पेटणार

अहमदनगर : प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जायकवाडी धरणात पाणी सोडण्याच्या निर्णयाला नाशिकनंतर आता अहमदनगर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी विरोध दर्शवला आहे. अहमदनगरच्या मुळा धरणातून मराठवाड्याच्या जायकवाडी धरणात पाणी सोडू नये, यासाठी आंदोलन करण्यात आले. अहमदनगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर घोडेगाव चौफुला येथे माजी मंत्री आ. शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको करण्यात आला. तब्बल दोन तास हे रास्ता रोको आंदोलन सुरू होते.

चालू वर्षी मुळा धरण पूर्ण क्षमतेने भरलेले नाही. तसेच मुळा धरणाच्या लाभक्षेत्रातही पुरेसा पाऊस झालेला नाही. विहिरी आणि बोअरवेलच्या पाण्याची पातळी खालावली आहे. अशा परिस्थितीत अहमदनगर जिल्ह्यातील मुळा, भंडारदरा आणि निळवंडे धरणाची वस्तुस्थिती माहिती असताना त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून गोदावरी पाटबंधारे महामंडळाच्या अधिका-यांनी मुळा धरणातून २.१० टीएमसी पाणी जायकवाडीला सोडण्याचा घेतलेला निर्णय एकतर्फी असल्याचे आमदार शंकरराव गडाख म्हणाले.

दरम्यान नगर-नाशिक जिल्ह्यातील पाणी मराठवाड्याला मिळावे, यासाठी मराठवाड्यातील नेते एकत्रित येतात. मात्र, नगर-नाशिकचे नेते एकत्र येताना दिसत नाहीत, अशी खंत गडाख यांनी व्यक्त केली. नाशिकचे नेते एकत्रित येतील की नाही माहिती नाही, पण नगर जिल्ह्यातील नेत्यांनी एकत्र यायला हवे आणि समन्यायी पाणी वाटपाबाबत पुनर्विचार व्हायला हवा, असेही गडाख म्हणाले.

नाशिकमध्येही विरोध
नाशिक जिल्ह्यातील गंगापूर आणि इतर धरणांमधून जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाला नाशिकमधील भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी विरोध दर्शवला. त्यामुळे हा वाद पेटण्याची चिन्हे असतानाच आता नगरमधूनही पाणी सोडायला विरोध होत आहे. त्यामुळे हा वाद चिघळण्याची शक्यता आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR