नागपूर : प्रतिनिधी
कोलकाता येथील सरकारी रुग्णालयात निवासी महिला डॉक्टरचा बलात्कार करून तिची हत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला आहे. दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ देशासह राज्यातील बहुतांश वैद्यकीय महाविद्यालयांतील निवासी डॉक्टर बेमुदत संपावर गेले आहेत.
या कृत्याच्या निषेधार्थ राज्यातील मुंबई, नागपूर छत्रपती संभाजीनगरसह इतरत्र त्याचे पडसाद आता उमटू लागले आहेत. अशातच, आज नागपुरातील महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडंट डॉक्टर्स अर्थात मार्डच्या संपकरी डॉक्टरांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे. या भेटीदरम्यान त्यांनी आपल्या मागण्या उपमुख्यमंत्र्यांकडे केल्या आहेत.
कोलकाता येथील पीडित डॉक्टरला न्याय मिळवून द्यावा, तसेस राज्यासह देशात सेंट्रल प्रोटेक्शन अॅक्ट लागू करण्यात यावा, अशा प्रमुख मागण्या या डॉक्टरांनी देवेंद्र फडणवीसांकडे केल्या आहेत. सोबतच राज्यातील मार्डच्या निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेच्या प्रश्नांची आणि इतर समस्यांची देखील माहिती यावेळी देण्यात आली आहे. तर उपमुख्यमंत्री फडणवीसांनी राज्यातील महिला निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेसंदर्भात विशेष खबरदारी घेणार असल्याचे आश्वासन या डॉक्टरांच्या शिष्टमंडळाला यावेळी दिल्याची माहिती पुढे आली आहे.
सोबतच नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मेयो आणि मेडिकल या दोन रुग्णालयांसह राज्यभरातील निवासी डॉक्टर संपावर असल्याने रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असल्याचे चित्र आहे. परिणामी, आपण आपला संप मागे घ्यावा, असे आवाहन देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या डॉक्टरांच्या शिष्टमंडळाला केले आहे.