22.3 C
Latur
Saturday, September 7, 2024
Homeक्रीडामार्केझ भारतीय फुटबॉल टीमचे नवे कोच

मार्केझ भारतीय फुटबॉल टीमचे नवे कोच

कोलकाता : भारतीय फुटबॉल संघाला फिफा वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेच्या क्वालिफिकेशनच्या तिस-या फेरीत पोहचण्यात अपयश आले होते. त्यानंतर प्रशिक्षक इगोर स्टिमॅक यांची हकालपट्टी करण्यात आली होती. आता यानंतर महिन्याभरातच भारताच्या पुरुष फुटबॉल संघाला नवा प्रशिक्षक मिळाला आहे.

इंडियन सुपर लीगमध्ये एफसी गोवा संघाचे मुख्य प्रशिक्षक असलेल्या स्पेनच्या मानोलो मार्केझ यांना भारतीय पुरुष फुटबॉल संघाचेही मुख्य प्रशिक्षकपद सोपवण्यात आले आहे. स्टिमॅक यांची हाकालपट्टी केल्यानंतर अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनच्या कार्यकारी समितीची शनिवारी बैठक झाली आणि त्यात मार्केझ यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला. २०२४-२५ या मोसमासाठी मार्केझ एफसी गोवा, तसेच भारतीय संघ या दोन्ही जबाबदा-या सांभाळतील. त्यानंतर ते केवळ भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक असतील. मार्केझ यांची नियुक्ती करताना त्यांच्या प्रशिक्षपदाचा कालावधी किती असेल, हे मात्र फेडरेशनने स्पष्ट केले नाही. ५५ वर्षीय मार्केझ हे एफसी गोवा संघाचे प्रशिक्षक असल्यामुळे त्यांना भारतीय फुटबॉलची चांगली ओळख आहे. तसेच ते २०२० पासून भारतात प्रशिक्षक म्हणून काम पाहात आहेत. त्यामुळे त्यांनी नजीकच्या काळात आलेले नवे खेळाडू आणि झालेले बदल पाहिले आहेत.

त्यांनी हैदराबाद एफसी संघाचेही मार्गदर्शन केले असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली हैदराबाद एफसीला २०२१-२२ मध्ये आयएसएल कपही जिंकून दिला होता. त्यानंतर ते २०२३ साली एफसी गोवा संघाचे प्रशिक्षक झाले. तसेच त्यांना स्पेनमध्येही प्रशिक्षणाचा अनुभव आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR