बीड : सकाळी आठच्या दरम्यान कपड्याला इस्त्री करत असताना अचानक विजेचा धक्का बसून युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी सकाळी आष्टी तालुक्यातील म्हसोबावाडी येथे घडली. ओंकार मच्छिंद्र शेकडे असे मृत युवकाचे नाव आहे.
आष्टी तालुक्यातील म्हसोबावाडी येथील ओंकार शेकडे या तरुणाचे लग्न ठरले होते. आज दुपारी सुपारीचा कार्यक्रम होता. याच कार्यक्रमात विवाहाची तारीख काढायची होती. दरम्यान, आज सकाळी आठ वाजेच्या दरम्यान ओंकार कपड्यांना इस्त्री करत होता. अचानक इस्त्रीमध्ये विद्युत प्रवाह उतरल्याने धक्का बसून ओंकारचा जागीच मृत्यू झाला.
एकुलता एक मुलगा गेल्याने शोक अनावर
तीन मुलीच्या पाठीवर ओंकार झाला होता. घरातील एकुलता एक मुलगा मृत झाल्याने शेकडे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या पश्चात आई-वडिल, तीन बहिणी असा परिवार आहे.