लातूर : प्रतिनिधी
१४ ओक्टोम्बर २०२४ च्या शासन निर्णयातील पदांना राज्याच्या अर्थसंकल्पात तरतूद न केल्यामुळे लातूर जिल्ह्यातील खाजगी प्राथमिक, माध्यमिक वं उच्च माध्यमिक शिक्षक समन्वय संघाच्या वतीने दि . २५ मार्च रोजी दुपारी तीव्र निदर्शने आंदोलन करून सामूहिक आत्मदहन करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या आंदोेलनाने प्रशासनाची एकच धांदल उडाली. आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांना यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले.
हे आंदोलन लातूर जिल्हा शिक्षक समन्वय संघांचे अध्यक्ष प्रा. नितीन सेलूकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. शिक्षक समन्वय संघाने महायल्गार आंदोलन केल्यामुळे शासन निर्णय घेण्यात आला. त्यानुसार ५२ हजार पदांना नागपूरच्या अर्थ संकल्पीय आधिवेशनात निधीची तरतूद होणे अपेक्षित होते. परंतु तसे झाले नाही. समाज घडवणा-या शिक्षकांना चला पुढे जाऊया या संकल्पनेतून २०२५-२६ च्या अर्थ संकल्पात तरतूद होणे अपेक्षित होते. शिक्षकांची अपेक्षा पूर्ण न झाल्यामुळे शिक्षकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला.
त्यातूनच बीड जिल्ह्यातील धनंजय नागरगोजे या शिक्षकाने आत्महत्या केली. शिवाय नैराश्येतून इतर चार शिक्षकांचा मृत्यू झाला. शासन ५२ हजार शिक्षकांची फसवणूक करीत आहे. त्यामुळे आमच्यासमोर जिवंतपनी मेल्याशिवाय दुसरा मार्ग नाही. त्यामुळे लातूर जिल्हाधिकारी कार्यालसमोर दुपारी १ वाजता तीव्र निदर्शने आंदोलन करून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला.
या आंदोलनात जिल्हा शिक्षक समन्वय संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा. नितीन सेलूकर, गिरीधर तेलंगे, बलभीम जगताप, बाळवंत शिंदे, गंगाधर डीघोळे, सुवर्णा हलकुडे, सुनंदा पाटील, अनिता चव्हाण, मीनाक्षी यादव, कमळ काळजापुरे, शीतल रोकडे, कोमल डोणगावे आदिसह हजारो शिक्षक बांधव उपस्थित होते.