सोलापूर : प्रतिनिधी
सोलापुरातील अक्कलकोट रोड औद्योगिक वसाहतीमधील सेंट्रल टेक्सटाईल मिल टॉवेल कारखान्याला शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत मालक आणि कामगार कुटुंबातील एकूण ८ जणांचा मृत्यू झाला आहे.
रविवारी पहाटे साडेतीन वाजता आग लागल्यानंतर याची माहिती सुरक्षारक्षकाला समजल्यानंतर त्याने बाजूच्या कारखान्यातील सुरक्षा रक्षकाला सांगून अग्निशामक दलाला कळविले. तातडीने अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळ आल्या.
कारखान्याच्या आतील भागात जाण्यासाठी अरुंद रस्ता असल्यामुळे मोठ्या अडचणी निर्माण झाल्या. तोपर्यंत आग मोठ्या प्रमाणावर भडकली होती. कारखान्याचे मालक उस्मान मन्सूरी तसेच एक कामगार कुटुंबीय असे एकूण ८ जण या कारखान्यात काम करून तेथेच राहत होते. मेहताब बागवान, त्यांची मुलगी हिना वसीम शेख आणि मुलगा सलमान मेहताब बागवान या तीन कामगार कुटुंबातील सदस्यांचे मृतदेह सकाळी बाहेर काढण्यात आले.
तर कारखान्याचे मालक उस्मान मन्सूरी यांच्या कुटुंबातील चार व कामगार कुटुंबातील एक अशा ५ जणांचा शोध सुरूच होता. मात्र दुपारी ओळखण्यापलीकडे झालेले कारखान्याचे मालक उस्मान मन्सूरी, त्यांचा नातू अनस ( २६ ) ,नात सून शिफा मन्सूरी ( २४ ) तसेच नातवाचा मुलगा युसूफ (१) व कामगार मेहताब बागवान यांची पत्नी आयेशा बागवान अशा ५ जणांचे मृतदेह मिळाले.सर्व मृतदेह शासकीय रुग्णालयात आणण्यात आले असून नातेवाईकांची प्रचंड गर्दी झाली होती.
एमआयडीसीमध्ये असलेल्या कारखान्यामध्ये टॉवेलसह अन्य साहित्य तयार करण्यात येत होते. पहाटे साडेतीन वाजता आग लागल्यामुळे आगीवर लवकर नियंत्रण आणता आले नाही. सोलापूर शहरासह अन्य ठिकाणाहून तसेच एनटीपीसीमधून सुद्धा आगीचे बंब मागविण्यात आले. मोठ्या प्रमाणावर पाणी मारण्यात आले. परंतु आग धूमसतच होती. जवळपास पाच ते सहा तासानंतर आगीवर नियंत्रण आणण्यात यश आले. मात्र आतून ओरडण्यात येत असलेला आवाज तोपर्यंत बंद झाला होता, अशी माहिती अग्निशामक दलाच्या जवानांनी दिली. अग्निशामक दलाच्या काही जवानांना देखील भाजले आहे. आगीची माहिती समजतात आमदार सुभाष देशमुख, माजी आमदार व कामगार नेते नरसय्या आडम मास्तर आदींनी घटनास्थळावर भेट दिली.