24.5 C
Latur
Tuesday, July 22, 2025
Homeमहाराष्ट्रकर्जमाफीसाठी राज्यात २४ जुलैला चक्का जाम आंदोलन

कर्जमाफीसाठी राज्यात २४ जुलैला चक्का जाम आंदोलन

कोल्हापुरात बच्चू कडू यांची घोषणा

कसबा बावडा : राज्यातील शेतक-यांची कर्जमाफी करून त्यांचा सातबारा कोरा करावा तसेच दिव्यांग आणि विधवांचे प्रलंबित प्रश्न सोडवावेत या मागणीसाठी येत्या दि. २४ जुलै रोजी राज्यभर दोन तास चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी येथे केली.

या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कसबा बावड्यातील श्री मंगल कार्यालयात हुंकार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी दिव्यांग बांधवांसह महिला, शेतकरी यांची मोठी उपस्थिती होती. राज्यातील शेतक-यांचा सातबारा कोरा करावा यासाठी अन्नत्याग आंदोलन झाले. पायी यात्रा काढली. मात्र राज्य सरकारने याबाबत कोणताच निर्णय घेतला नाही. आंदोलनाकडे दुर्लक्ष केले.

याबाबत सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी येत्या दि. २४ जुलै रोजी राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्णय प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार दिव्यांग संस्थेच्या वतीने घेण्यात आला असल्याचे सांगून बच्चू कडू म्हणाले शेतीमालाला चांगला भाव भेटत नाही. जर शेतीमालाला चांगला भाव भेटला तर देश सुखी व्हायला वेळ लागणार नाही. मग शेतकरी सरकारकडे कर्जमाफी करा म्हणून कधीच मागणी करणार नाही. पण शेतमालाला चांगला भाव मिळत नाही हे मोठे दुर्दैव आहे.

दिव्यांगांच्या प्रश्नाबाबत बोलताना ते म्हणाले अपंगांना आपल्या विविध मागण्या मान्य करून घेण्यासाठी आंदोलन करावे लागते, याच्यासारखे दुर्दैव काय? असा प्रश्न करून ते म्हणाले सरकारने दिव्यांगांच्या पेन्शनमध्ये एक हजार रुपयाची वाढ करून ती आता अडीच हजार रुपये केली आहे. ही संघटनेने दाखविलेल्या ताकदीचे यश आहे. अजूनही आपले अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्यासाठी आपणास रस्त्यावरची लढाई लढावी लागणार आहे. प्रारंभी जिल्हाध्यक्ष देवदत्त माने यांनी प्रास्ताविक केले. यावेळी समाधान हेगडकर यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व दिव्यांग बांधव मोठया संख्येने उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR