मुंबई : विशेष प्रतिनिधी
महायुतीतून भाजपची पहिली यादी आली आहे. मविआमध्ये जागावाटपावरून आघाडी तुटण्यापर्यंत ताणली गेली आहे. अशातच बच्चू कडू, संभाजीराजे आणि राजू शेट्टी यांनी बनविलेली तिसरी आघाडी महायुती आणि मविआतील बिघाडीवर डोळा ठेवून आहेत. महायुती, मविआत तिकीट न मिळाल्याने नाराज असलेले नेते फोडण्याची तयारीही परिवर्तन महाशक्तीने चालविली आहे.
राजू शेट्टी, संभाजीराजे छत्रपती आणि बच्चू कडू यांसह समविचारी मंडळी एकत्र चर्चा करणार आहेत. महाशक्तीच्या ज्या मजबूत जागा आहेत त्या जागांवरील यादी १-२ दिवसांत जाहीर केली जाणार आहे. यामध्ये सुमारे १०० लोक सामिल असतील. यानंतर पुढच्या याद्या जाहीर केल्या जातील. आघाडी आणि युतीमध्ये काय बिघाडी होते यावर परिवर्तन महाशक्तीचे नेते लक्ष ठेवून आहेत. चांगले नेते असतील तर त्यांना महाशक्तीमध्ये घेणार आहोत. महायुती किंवा आघाडीचे कोणतेही मोठे नेते असतील तरी त्यांच्याविरोधात उमेदवार देण्याचा महाशक्तीचा प्रयत्न राहणार आहे.
मनोज जरांगे परिवर्तन महाशक्तीच्या सोबत येणार की नाही तसेच जर सोबत नाही आले तर काय, याबाबत कोणती भूमिका घ्यायची याची जबाबदारी संभाजीराजेंवर सोपविण्यात आली आहे. तूर्त तरी भाजप आपल्याच उमेदवाराला बकरा करू लागला अशी स्थिती आहे.
८ उमेदवारांची घोषणा…
सांगली जिल्ह्यातील शिरोळ व मिरज या दोन मतदारसंघांत राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार उद्या जाहीर करण्यात येणार आहेत. तत्पूर्वी बच्चू कडू (अचलपूर), अनिल चौधरी (रावेर), गणेश निंबाळकर (चांदवड), सुभाष साबणे (देगलूर), अंकुश कदम (ऐरोली), माधव देवसरकर (हदगाव-हिमायतनगर), गोविंदराव भवर (हिंगोली), वामनराव चटप (राजुरा) यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली.