22.5 C
Latur
Sunday, October 20, 2024
Homeमहाराष्ट्रमविआची सोमवारी होणार संयुक्त पत्रकार परिषद?

मविआची सोमवारी होणार संयुक्त पत्रकार परिषद?

कॉंग्रेसची दिल्लीत खलबते, शरद पवारांची मध्यस्थी

मुंबई : प्रतिनिधी
महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद सोमवार, दि. २१ ऑक्टोबर रोजी होणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. या पत्रकार परिषदेत जागावाटप जाहीर होऊ शकते. कोणता पक्ष किती जागांवर लढणार, याचा निर्णय उद्याच्या पत्रकार परिषदेत जाहीर केला जाऊ शकतो. आमचे सगळे ठरले आहे. त्यामुळे उद्या जागावाटप जाहीर करणार असल्याची माहिती शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी दिली. दरम्यान, राज्यातील कॉंग्रेस नेते दिल्लीत दाखल झाले असून, त्यांची कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत बैठक झाली. रात्री उशिरापर्यंत चर्चा सुरू होती. दरम्यान, याबाबत शरद पवार यांनीही मध्यस्थी केल्याचे समजते.

आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, जयंत पाटील, संजय राऊत आणि अनिल देसाई यांची बैठक झाली. या बैठकीनंतर अनिल देसाई यांनी याबाबतची माहिती दिली. काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटात काही ठिकाणच्या जागांवर तिढा असल्याची माहिती मिळाली आहे. याच पार्श्वभूमीवर आज युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी माजी मंत्री अनिल परब देखील उपस्थित होते.

दरम्यान, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या घरी महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांची महत्त्वाची बैठक रात्री उशिरापर्यंत सुरू होती. ठाकरेंच्या शिवसेनेसोबत जागावाटपावरुन झालेले मतभेद बैठकीच्या केंद्रस्थानी आहेत. विदर्भातील काही जागांवरून हे मतभेद आहेत. त्यावर तोडगा काढण्यासाठी खरगे यांनी बैठक बोलावली. या बैठकीतील निर्णयाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

पवारांची कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा
शिवसेनेच्या नेत्यांसोबत चर्चा केल्यानंतर शरद पवार यांनी काँग्रेसच्या दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांशी फोनवरुन चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली. विदर्भातील एकूण १२ जागांवर शिवसेनेच्या ठाकरे गटाने दावा सांगितला आहे. या १२ जागांवर महाविकास आघाडीचा आमदार नाही. मविआचा आमदार नसलेल्याच १२ जागा आम्ही मागितल्या असल्याचे शिवसेनेचे म्हणणे आहे.

एकत्र बसून तोडगा काढू
महाविकास आघाडीत कुठलाही वाद नाही. १५ तास बसू पण तोडगा काढू असे मत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे. सकाळी उद्धव ठाकरेंसोबत बैठक झाली आता पवार साहेब यांना भेटायला आलो असल्याचे राऊत म्हणाले. महाविकास आघाडीत सर्व काही सुरळीत सुरू आहे, असे ते म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR