मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रमांच्या केंद्रिकृत प्रवेश प्रक्रियेला (कॅप फेरी) गुरुवार, ६ ऑगस्टपासून सुरुवात केली आहे. नीट-यूजी परीक्षेत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना या प्रक्रियेसाठी नोंदणी करता येणार असून, अर्ज नोंदणीची अंतिम तारीख १२ ऑगस्ट आहे, तर पहिली गुणवत्ता यादी २३ ऑगस्टला जाहीर करण्यात येणार आहे.
यंदा प्रवेश प्रक्रियेत आणखी एक महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. पूर्वी संस्थास्तरावर भरल्या जाणा-या संस्थात्मक आणि कॅपनंतर शिल्लक राहिलेल्या जागा आता सीईटी कक्षामार्फत पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने भरल्या जाणार आहेत. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेत अधिक पारदर्शकता येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अनिवासी भारतीय विद्यार्थ्यांनी पात्रता पडताळणीसाठी ११ ऑगस्टपूर्वी विदेशी उमेदवार नोंदणी पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. हे विद्यार्थी गुणवत्तेनुसार केवळ १५ टक्के संस्थात्मक कोट्यातील जागांसाठी पात्र राहतील.
ओबीसी व एसईबीसी विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेसाठी नोंदणी झाल्यापासून सहा महिन्यांपर्यंत वाढवण्यात आली आहे. प्रवेश प्रक्रियेत कागदपत्रांबाबत विशेष खबरदारी घेतली आहे. आवश्यक कागदपत्रे अपलोड न करणा-या विद्यार्थ्यांचा प्रवेशासाठी विचार केला जाणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नोंदणीपूर्वी सर्व कागदपत्रांची पूर्तता करून ठेवावी, असे सीईटी कक्षाने स्पष्ट केले आहे. आवश्यक कागदपत्रांच्या रंगीत स्कॅन प्रती अपलोड करणे बंधनकारक केले आहे.
प्रवेशाचे वेळापत्रक
– ऑनलाइन नोंदणी : ६ ते १२ ऑगस्ट
– नोंदणी शुल्क भरणे : ६ ते १३ ऑगस्ट
– कागदपत्रे अपलोड : ६ ते १३ ऑगस्ट
– कागदपत्र पडताळणी : ७ ते १४ ऑगस्ट
– नोंदणीकृत उमेदवारांची यादी : १५ ऑगस्ट
– अंतिम गुणवत्ता यादी : १८ ऑगस्ट
– पसंतीक्रम भरणे : १९ ते २२ ऑगस्ट
– पहिली गुणवत्ता यादी : २३ ऑगस्ट
















