23.9 C
Latur
Thursday, January 23, 2025
Homeपरभणीशेतीमधील समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना आवश्यक

शेतीमधील समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना आवश्यक

राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे आवाहन मंत्री गडकरी, विखे यांना मानद डॉक्टर ऑफ सायन्स पदवी

परभणी/प्रतिनिधी
अन्न आणि ऊर्जा सुरक्षा महत्त्वाची आहे. हवामान बदलानुसार शेतीमध्ये विविध समस्या आहेत. या सोडवण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. यासाठी शास्त्रज्ञांनी आंतरविद्या शाखेचे ज्ञान अवगत करणे आवश्यक आहे असे प्रतिपादन माननीय राज्यपाल तथा माननीय कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांनी केले.

विद्यापीठाच्या सुवर्ण जयंती दीक्षांत सभागृहात संपन्न झालेल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या २६ व्या दीक्षांत समारंभात अध्यक्षस्थानावरून बोलत होते. पुढे बोलतांना ते म्हणाले की, भारतात उच्च मूल्य किमतींच्या पिकांची लागवड करणे आवश्यक आहे. सध्या आपण फळांची निर्यात करत आहोत. पूर्वी अन्नधान्याचा तुटवडा होता परंतु आज स्वयंपूर्ण असून आपण अनेक कृषि मालांची निर्यात करत आहोत. हे केवळ शेतक-यांच्या मेहनतीमुळे आणि विद्यापीठांच्या संशोधनामुळे शक्य होत आहे.

देशाने केलेल्या शेतीतील क्रांत्याचा त्यांनी उल्लेख केला. देशाची लोकसंख्या वाढत असताना देखील भारत शेती उत्पादन वाढवून अन्नसुरक्षता करत आहे. कृषी व्यवसाय हा भारताचा कणा आहे. शेती आणि शेती व्यवसायात काळानुरूप बदल करणे आवश्यक आहे. यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करावा लागेल. शेतकरी केंद्रित संशोधन करणे आवश्यक आहे. यावेळी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांच्या नेतृत्वाखाली नाविन्यपूर्ण राबवलेले उपक्रम माझा एक दिवस माज्या बळीराजा सोबत याची स्तुती केली तसेच विद्यापीठाने मागील दोन वर्षात बीजोत्पादनामध्ये तीन पट वाढ करून शेतकरी वर्गांना गुणवत्ता युक्त बियाणे उपलब्ध करून दिल्याबद्दल अभिनंदन केले.शेतीमध्ये उत्पादकता वाढवणे आवश्यक आहे यासाठी योग्य मानकांचा आणि अचूक शेती पद्धतीचा वापर करावा लागेल.

२०४७ पर्यंत अन्नसुरक्षतेतूनच विकसित भारताचे स्वप्न पूर्ण होईल आणि आपला देश कृषि मालाच्या निर्यातदार होईल. विद्यापीठाचे संशोधन यापेक्षाही अधिक क्षेत्रात निर्यात करण्यास मदत करेल. शेतक-यांच्या कल्याणात विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. विद्यार्थ्यांचा उत्साह २०४७ मधील विकसित भारत होऊन जगाला अन्नधान्य पुरवठा करण्याची क्षमता दर्शवितो. यावेळी माननीय राज्यपालांनी विद्यार्थ्यांना आपल्या कुटुंबाला प्राधान्य द्यावे, पालकांना समाधानी ठेवून त्यांचा आदर करावा. यश अपयश येतच असते, यावर मात करून स्वत:ही आनंदी राहावे. आज आपल्या नव्या जीवनाची सुरुवात होत आहे, मिळालेल्या ज्ञानाचा शेतक-यांच्या आणि समाजांच्या हितासाठी उपयोग करावा असा सल्ला त्यांनी दिला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR