नवी दिल्ली : सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. दिल्लीचे विद्यमान नायब राज्यपाल व्ही.के. सक्सेना यांच्या अवामनप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. मानहानीच्या प्रकरणात त्यांना दक्षिण पूर्व दिल्लीतून अटक करण्यात आली आहे. एलजी विनय सक्सेना यांनी मेधा पाटकर यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. मेधा पाटकर यांना दुपारी साकेत न्यायालयात हजर केले जाईल. मेधा पाटकर यांच्या वकिलाने दिल्ली उच्च न्यायालयातून त्यांची याचिका मागे घेतली आहे.
दिल्ली उच्च न्यायालयाने मेधा पाटकर यांच्या वकिलाला नवीन याचिका दाखल करण्याची परवानगी दिली आहे. मेधा पाटकर यांच्या नवीन याचिकेवर आज दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. प्रोबेशन बॉन्ड सादर करण्याच्या आणि १ लाख रुपयांचा दंड भरण्याच्या आदेशाचे जाणूनबुजून उल्लंघन केल्याबद्दल साकेत न्यायालयाने मेधा पाटकर यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले. मेधा पाटकर यांनी कनिष्ठ न्यायालयाने दिलेल्या एनडब्ल्यूबीच्या आदेशाला दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मानहानीच्या प्रकरणात साकेत न्यायालयाने जारी केलेले अजामीनपात्र वॉरंट बजावून दिल्ली पोलिसांनी मेधा पाटकर यांच्या अटकेची कारवाई केली.
त्या जाणूनबुजून न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करत आहेत, त्यांचा हेतू स्पष्ट आहे असे कोर्टाने नमूद केलं. न्यायालयात हजर राहणे त्या टाळत आहेत आणि त्यांच्याविरुद्ध लावण्यात आलेल्या शिक्षेच्या अटी स्वीकारण्याचेही टाळत आहेत. या न्यायालयाने ८ एप्रिल रोजी दिलेल्या शिक्षेच्या निलंबनाचा कोणताही आदेश नाही असेही न्यायालयाने नमूद केले.
२००० साली दाखल झाला गुन्हा
मेधा पाटकर आणि व्ही.के. सक्सेना हे दोघेही २००० सालापासून कायदेशीर लढाई लढत आहेत. सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर त्यांच्या नर्मदा बचाओ आंदोलनासाठी ओळखल्या जातात. २००० साली त्यांच्याविरोधात दिल्लीत मानहानीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच खटल्यासंदर्भात काही दिवसांपूर्वी दिल्ली न्यायालयात सुनावणी देखील झाली होती. तेव्हा न्यायालयाने मेधा पाटकर यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. आज त्यानुसार कारवाई करत दिल्ली पोलिसांनी त्यांना अटक केली.