नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळ््यातील मुख्य आरोपी आणि फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीला बेल्जियममध्ये अटक करण्यात आली. भारतीय सुरक्षा एजन्सींच्या विनंतीवरून चोक्सीला अटक झाली. केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (सीबीआय) बेल्जियममधील सरकारकडे विनंती केली होती. त्यानंतर ६५ वर्षीय मेहुल चोक्सीला अटक करण्यात आली. तो आता तुरुंगात आहे.
मेहुल चोक्सी याने पंजाब नॅशनल बँकेत १३,५०० कोटी रुपयांचा कर्ज घोटाळा केला होता. अटकेपासून वाचण्यासाठी तो भारतातून बेल्जियममध्ये फरार झाला होता. तो तेथे त्याची पत्नी प्रीती चोक्सीसोबत अँटवर्पमध्ये राहात होता. प्रीती चोक्सीकडे बेल्जियमचे नागरिकत्व आहे. चोक्सीकडे बेल्जियममध्ये ‘एफ रेसिडेन्सी कार्ड’ आहे.
वॉरंटच्या आधारे केली कारवाई
मेहुल चोक्सीला अटक करताना बेल्जियम पोलिसांनी मुंबई न्यायालयाने त्याच्याविरुद्ध जारी केलेल्या दोन अटक वॉरंटचा हवाला दिला. मुंबई न्यायालयाने वॉरंट २३ मे २०१८ आणि १५ जून २०२१ रोजी जारी करण्यात आले होते.
चोक्सीच्या एकूण ४१ मालमत्ता जप्त
२०१८ मध्ये ईडीने चोक्सीच्या १,२१७ कोटी रुपयांच्या ४१ स्थावर मालमत्ता तात्पुरत्या स्वरूपात जप्त केल्या होत्या. जप्त केलेल्या मालमत्तांमध्ये मुंबईतील आलिशान भागात असलेले त्याचे दोन फ्लॅट, कोलकातामधील एक मॉल, मुंबई-गोवा महामार्गावरील २७ एकर जमीन यांचा समावेश आहे.
पंजाब बँकेची फसवणूक
पंजाब नॅशनल बँकेतील १३,८५० कोटी रुपयांच्या कर्ज घोटाळ््याप्रकरणी मेहुल चोक्सीवर सीबीआय आणि ईडीकडून खटला दाखल केला आहे. या प्रकरणात चोक्सीचा पुतण्या नीरव मोदीसुद्धा आरोपी आहे. तो लंडनमध्ये असल्याचे सांगितले जात आहे. त्याचे प्रत्यार्पण होण्याची शक्यता आहे. मेहुल चोक्सी जानेवारी २०१८ मध्ये त्याचा पुतण्या नीरव मोदीसह भारतातून पळून गेला होता.