22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeराष्ट्रीयकावड मार्गावरील दुकानांवर नावाचा उल्लेख ; जयंत चौधरी यांचा विरोध

कावड मार्गावरील दुकानांवर नावाचा उल्लेख ; जयंत चौधरी यांचा विरोध

मुझफ्फरनगर : भाजपचा मित्रपक्ष आरएलडीचे प्रमुख जयंत चौधरी यांनी कावड मार्गावरील दुकानदारांना आपल्या नावाचा उल्लेख करण्याच्या निर्णयाला विरोध केला आहे. उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने कसलाही विचार न करता हा निर्णय घेतला असल्याचा दावाही त्यांनी केला. दरम्यान अजूनही वेळ आहे, सरकारने हा निर्णय मागे घ्यावा किंवा त्यावर जास्त जोर देऊ नये, असे आवाहनही जयंत चौधरी यांनी योगी सरकारला केले आहे.

योगी सरकारने हा निर्णय घेतल्यापासून देशभरातील विविध स्तरांतून यावर प्रतिक्रिया येत असून, योगी सरकारवर जोरदार टीका केली जात आहे. दरम्यान, आता एनडीए सरकारचे सहयोगी जयंत चौधरी यांनी देखील भाजप सरकारच्या निर्णयाला कडाडून विरोध केला आहे. जयंत म्हणाले की, कावड घेऊन जाणा-या व्यक्तींची कोणतीच ओळख नाही. धर्म किंवा जातीच्या आधारावर कोणीही सेवा घेत नाही. या प्रकरणाला धर्म आणि जातीशी जोडता कामा नये. प्रत्येकजण आपापल्या दुकानावर नावे लिहित आहे. मॅकडोनाल्ड आणि बर्गर किंग आपल्या दुकानावर काय नाव लिहिणार? असा सवालही जयंत चौधरी यांनी उपस्थित केला.

देशात हिंदूही आहेत मांसाहारी-चौधरी
योगी सरकारने हा निर्णय कोणताही सखोल विचार न करता घेतला असून, हा निर्णय मागे घेतला पाहिजे. देशातील अनेक मुस्लिम शाकाहारी आहेत आणि अनेक हिंदू मांसाहारी आहेत, त्यामुळे आता कुठे कुठे नाव लिहायचे? आता कुर्त्यावरही नावे लिहायला सुरुवात करावी का? ज्यामुळे कोणालाही भेटताना हस्तांदोलन करावे का गळाभेट घ्यावी हे कळेल, असा टोलाही जयंत चौधरी यांनी योगी सरकारला लगावला.

सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

दरम्यान, उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने कावड मार्गावरील दुकानांवर मालकांची नावे लिहिण्याचे आदेश दिले आहेत. योगी सरकारच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. हा आदेश रद्द करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाकडे करण्यात आली आहे. असोसिएशन फॉर प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट्सने योगी सरकारच्या या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात शनिवारी याचिका दाखल केली असून, त्यावर सोमवारी सुनावणी होणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR