नांदेड : मुखेड तालुक्यातील अंबुलगा बु. व परिसरात आज २५ ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी १४:४३ वा व १५:१३ वा दोन वेळा भुगभार्तून आवाज येऊन सौम्य हादरे जाणवले असल्याची माहिती जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्राने दिली.
अधिकृतरित्या दिलेल्या वृत्तानुसार या भूकंपसदृश हाद-यांची तीव्रता रिक्टर स्केलवर अनुक्रमे १.५ व ०.७ अशी नोंदविण्यात आलेली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदूू मुखेड शहरापासून १२ किमी दूर दक्षिणपूर्व दिशेला असून या धक्क्यामुळे कुठलीही जीवित व वित्त हानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे. यापूर्वी हदगाव तालुक्यातील सावरगाव येथे दि. २२ ऑक्टोबर रोजी भूकंपाचे धक्के जाणवले होते. तर त्यापूर्वी कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा येथे भूकंपाचे धक्के धक्के जाणवले होते. गेल्या काही वर्षांपासून भूकंपाचे धक्के बहुतांश जिल्ह्यांमध्ये जाणवत असून याची तीव्रता कमी जरी असली तरी या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये मात्र भीतीचे वातावरण पसरत आहे.
आंबुलगा बु. भीतीच्या छायेत
मुखेड तालुक्यातील आंबुलगा बु. येथील अनेक ग्रामस्थ अजूनही भीतीच्या सावटाखाली आहेत. तर अनेक ग्रामस्थ घराबाहेर असल्याचे सांगण्यात आले. यासंदर्भात आपत्ती व्यवस्थापन समितीच्यावतीने उपाययोजना करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाच्यावतीने देण्यात आली. त्यामुळे ग्रामस्थांनी घाबरून जाऊ नये असे आवाहनही करण्यात आले आहे.