अमरावती : जळगाव जिल्हा आणि सातपुड्याच्या पायथ्याचा परिसर भूगर्भीयदृष्ट्या सक्रिय असलेल्या तापी भ्रंश रेषेच्या (तापी फॉल्ट झोन) प्रभावक्षेत्रात येतो. त्यामुळे मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यात शनिवारी सकाळी झालेल्या भूकंपाचे सौम्य धक्के जळगावसह उत्तर महाराष्ट्रात हादरे बसले असून रविवारी पहाटेच्या सुमारास पुन्हा भूकंपाच्या सौम्य धक्कांनी परिसरला हादरवला आहे.
सकाळी ९ वाजून १५ मिनिटांनी झालेल्या या भूकंपाची तीव्रता ४.५ रिश्टर स्केल नोंदवण्यात आली. केंद्रापासून सुमारे १०० किमी परिसरात भूकंपाच्या लहरींचा परिणाम जाणवला. जळगावसह धुळे, नंदुरबार, अमरावती आणि बुलढाणा जिल्ह्यांतील काही भागांतही नागरिकांना धक्के जाणवले. सुदैवाने कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झालेली नाही. जळगाव शहरातील मध्यवर्ती भागासह रामानंद नगर, ख्वाजामिया चौक, मेहरूण, गेंदालाल मिल, शिवाजीनगर, पिंप्राळा, निमखेडी आणि कोल्हे हिल्स परिसरातील नागरिकांना सौम्य कंपने जाणवली. काही घरांतील भांडी हलली, तर खिडक्यांचा आवाज झाल्याने नागरिक घराबाहेर पडले. जिल्ह्यातील मुक्ताईनगर, रावेर, यावल, भुसावळ, चोपडा आणि जामनेरसह सर्व १५ तालुक्यांत धक्के जाणवले.
देशभरात दिवसभरात १५ भूकंप
राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या (एनसीएस) नोंदीनुसार, रविवारी मध्यरात्रीपासून दुपारी अडीच वाजेपर्यंत भारत आणि शेजारील प्रदेशांत भूकंपाचे एकूण १५ धक्के नोंदवले गेले. यामध्ये खरगोन येथील ४.५ रिश्टर स्केलचा भूकंप भारतीय भूभागावरील सर्वाधिक तीव्रतेचा ठरला.
असे धक्के बसत राहतील
खरगोनमधील सुखपुरी येथे जमिनीखाली १० किमी खोलीवर भूकंपाचे केंद्र होते. नर्मदा आणि तापी नदीखो-यांतील भूगर्भीय रचना तसेच डेक्कन ट्रॅप्समधील खडकांच्या थरांची हालचाल यामुळे भूकंपाचे धक्के बसू शकतात. भारतीय मानक ब्युरोच्या वर्गीकरणानुसार जळगाव जिल्हा भूकंपप्रवण क्षेत्राच्या झोन २ किंवा ३ मध्ये येतो. हा भाग अतिसंवेदनशील नसला तरी भूकंपमुक्त नाही. ३ ते ४.५ तीव्रतेचे धक्के अधूनमधून जाणवू शकतात अशी माहिती मु. जे. महाविद्यालयाचे विभागप्रमुख डॉ. चेतन महाजन यांनी सांगितले.
















