मुंबई : उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद झाली, तेव्हाही मिंिलद नार्वेकर मातोश्रीत होते. पत्रकार परिषदेनंतर काही वेळाने ते मातोश्रीच्या बाहेर पडले. यावेळी त्यांना मीडियाने घेरले. तुम्ही शिंदे गटात जाणार आहात का? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर त्यांनी उत्तर देणे टाळले. मिलिंद नार्वेकर हो सुद्धा म्हणाले नाहीत आणि नाही सुद्धा म्हणाले नाहीत.
उद्धव ठाकरे यांचे सेक्रेटरी आणि अत्यंत जवळचे सहकारी मिलिंद नार्वेकर हे शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा सकाळपासून रंगल्या आहेत. शिंदे गटाने मिलिंद नार्वेकर यांना दक्षिण मुंबईतून लढण्याची ऑफर दिली आहे. त्यामुळे मिलिंद नार्वेकर शिंदे गटात जाणार असल्याचे सांगितले जात आहे. या चर्चा सुरू झाल्यानंतर मिलिंद नार्वेकर यांनी थेट मातोश्री गाठली. उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि त्यानंतर ते बाहेर पडले. मातोश्रीतून बाहेर आल्यानंतर नार्वेकर शांत होते. फक्त चेह-यावर स्मित हास्य होते. त्यांनी मीडियाशी बोलण्यास नकार दिला. त्यामुळे मातोश्रीत नेमके काय घडलं? मिलिंद नार्वेकर उद्धव ठाकरेंची साथ सोडणार का? उद्धव ठाकरे दक्षिण मुंबईतून लढणार का? असे प्रश्न अनिर्णित राहिले आहेत.
मिलिंद नार्वेकर आज सकाळीच मातोश्रीवर गेले. त्यानंतर उद्धव ठाकरे हे दुपारी मीडियाशी संवाद साधणार असल्याचा निरोप आला. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेचा मिलिंद नार्वेकर यांच्याबाबत उठलेल्या चर्चांशी संबंध जोडला गेला. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेचा विषय वेगळाच निघाला. त्यांनी निवडणूक आयोगाकडून आलेल्या नोटिशीवर भाष्य केले. पण मिलिंद नार्वेकर यांच्याबाबत बोलण्यास नकार दिला.
उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद झाली, तेव्हाही मिलिंद नार्वेकर मातोश्रीत होते. पत्रकार परिषदेनंतर काही वेळाने ते मातोश्रीच्या बाहेर पडले. यावेळी त्यांना मीडियाने घेरले. तुम्ही शिंदे गटात जाणार आहात का? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर त्यांनी उत्तर देणे टाळले. मिलिंद नार्वेकर हो सुद्धा म्हणाले नाहीत आणि नाही सुद्धा म्हणाले नाहीत. हसत हसत सर्वांना हात जोडत ते निघून गेले. त्यामुळे मिलिंद नार्वेकरांबाबतचा सस्पेन्स कायम राहिला आहे. मिलिंद नार्वेकर काय निर्णय घेणार हे अद्याप समजू शकले नाही. मिलिंद नार्वेकर यांच्या सायलंट राहण्यात गुपीत दडल्याचेही सांगितले जात आहे.