22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeसोलापूरराज्यात दूध दराच्या आंदोलनाला सोलापूर जिल्ह्यातून सुरुवात

राज्यात दूध दराच्या आंदोलनाला सोलापूर जिल्ह्यातून सुरुवात

अकलूज – दुधाचा उत्पादन खर्च अधिक आणि उत्पन्न कमी असल्यामुळे शेतकऱ्याचे आर्थिक गणित कोलमडले असून यावर सरकारने पाच रूपये अनुदानाची घोषणा केली. पण हे अनुदान सहकारी दूध संघांना असणार आहे. महाराष्ट्रातील ७० टक्के दूध खासगी दूध संघांना जाते. यामुळे दूध उत्पादकांना न्याय देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना दूध दराचे आंदोलन तीव्र करणार असून राज्यातील या आंदोलनाची सुरूवात सोलापूर जिल्ह्यातून करणार असून यासाठी कोणत्याही मंत्र्याला रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशारा असल्याची घोषणा संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी अकलूज येथे दिला.

तुपकर पुढे म्हणाले, सरकारने पशुखाद्याचे दर नियंत्रित करावेत, दूध उत्पादकांना सरसकट ५ रूपये अनुदान व ३४ रूपये लीटर दर द्यावा, यामध्ये खासगी आणि सहकारी संघ असा फरक करू नये. सरकारने जर हा दर आणि अनुदान दिले नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील कोणत्याही मंत्र्याला रस्त्यावर फिरू देणार नाही .शेतकरी लवकरच आक्रमक आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर उतरतील असा इशारा आम्ही माळशिरस तालुक्यातून सरकारला देत आहोत. अन्यथा कोणत्याही मंत्र्याला रस्त्यावर फिरू देणार नसल्याचा इशारा तुपकर यांनी दिला. सहकारी संघांना अनुदान दिल्याची घोषणा करून सरकार दूध उत्पादक शेतकऱ्यांना फसवू पाहात आहे. या अनुदानाचा किती टक्के दूध उत्पादकांना लाभ मिळणार, खासगी दूध संघ मोकाट सुटतील व शेतकऱ्यांना नागवले जाईल, अशी भीती व्यक्त केली.

सर्वच दूध उत्पादक शेतकऱ्यांनी अनुदान मि ळवण्यासाठी सहकारी दूध संघांना दूध घालायचे ठरवले तर सहकारी संघांची तेवढ्या मोठ्या प्रमाणात दूध घेण्याची क्षमता नाही. सरकारने सहकारी दूध संघाकडील सर्व दूध खरेदी करण्याची योजना जाहीर करावी व मगच अशा फुसक्या अनुदानाचा बाता माराव्यात. अन्यथा दुधाला सरसकट अनुदान जाहीर करावे. एका बाजूला दुधाला एक किंवा दोन रूपये दूध दर वाढला तर यामुळे लगेच दुसऱ्या बाजूला पशुखाद्याच्या दरात २० ते २५ रूपयांची वाढ होते. हे चालणार नाही. पशुखाद्याच्या किमती २० ते २५ टक्क्यांनी कमी करायला हव्यात. त्या किंमती नियंत्रणात आणायला हव्यात तरच दूध उत्पादकांना त्याचा फायदा होईल. जर सरसकट अनुदान मिळाले नाही व पशुखाद्याचे दर नियंत्रणात आणले नाहोत तर आम्ही कोणत्याही मंत्र्याला रस्त्यावर फिरू देणार नसल्याचा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला.

यावेळी खंडकरी शेतकरी संघटनेचे सोमनाथ वाघमोडे, भानुदास सालगुडे पाटील, पांडुरंग वाघमोडे, विष्णू गोरड, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष अजित बोरकर, समाधान फाटे, सचिन पाटील, तानाजी बागल, किशोर सूळ, रमेश पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटना, रयत क्रांती शेतकरी संघटना, खंडकरी शेतकरी संघटना व विविध संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR