धाराशिव : प्रतिनिधी
वडिलांच्या नावे असलेल्या जमिनीचा फेर घेण्यासाठी केलेला अर्ज मंडळ अधिका-यांकडे पाठविण्यासाठी महिला तलाठ्याने शेतक-याला ८ हजार रूपये लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती ३ हजार ५०० रूपये स्विकारत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने महिला तलाठ्यास रंगेहाथ पकडले. ही कारवाई उमरगा तालुक्यातील पेठसांगवी येथे करण्यात आली.
उमरगा तालुक्यातील पेठसांगवी सज्जाच्या तलाठी म्हणून आश्विनी बालाजी देवनाळे (वय ३५) या कार्यरत आहेत. सदर तलाठी देवनाळे यांनी तक्रारदार त्यांच्या वडिलांचे नावे असलेली जमीन त्यांचे नावे फेर घेण्याकरीता यातील महिला तलाठी यांच्याकडे अर्ज केला होता. तक्रारदार यांच्या अर्जावरून नोटीस काढून फेर घेण्याचा अर्ज मंडळ अधिकारी यांच्याकडे पाठविण्याकरीता तलाठी देवनाळे यांनी तक्रारदार यांच्याकडे पंचासमक्ष ८ हजार रूपये लाचेची मागणी केली होती. मात्र तडजोडी अंती ३ हजार ५०० रूपये लाच स्विकारण्याचे मान्य केले.
याबाबत तक्रारदार यांनी ५ मार्च रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धाराशीव येथे दूरध्वनीवर संपर्क साधुन तक्रार दिली होती. त्यानुसार ६ मार्च रोजी पेठसांगवी (ता. उमरगा) येथे तलाठी कार्यालयात पडताळणी केली असता आरोपीने पंचासमक्ष ८ हजार रूपयांची मागणी करून तडजोडी अंती ३ हजार ५०० रूपये लाच रक्कम स्विकारण्याचे मान्य केले. सदरची लाच रक्कम तलाठी देवनाळे यांनी पंचासमक्ष स्वत: स्विकारली.
यावेळी त्यांना लाचेच्या रक्कमेसह रंगेहाथ पकडण्यात आले असून, सदर तलाठी देवनाळे यांच्यावर पोलीस ठाणे लोहारा येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया चालू आहे. दरम्यान, आरोपीची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे लाचेची ३ हजार ५०० रूपये रक्कम, इतर २ हजार ७६० रूपये रक्कम, ५ ग्रॅम सोन्याची अंगठी, सोनाटा कंपनीचे मनगटी घड्याळ, सॅमसंग कंपनीचा मोबाईल असा मुद्देमाल मिळून आला. तसेच आरोपीच्या घराचीही झडती घेण्यात येत आहे.
आरोपी विरूद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु असून, आरोपी ही महिला असल्याने तिला अटक करण्यासाठी न्यायालयाची परवानगी घेण्यात आली आहे. आरोपीस अटक करुन तपास करण्याची तजवीज ठेवण्यात आली आहे. तसेच त्यांचा मोबाईल ताब्यात घेण्यात आला असून, पुढील निरीक्षण करून तपास करण्याची तजवीज ठेवण्यात आली आहे.
सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग छत्रपती संभाजीनगरचे पोलीस अधिक्षक संदिप आटोळे, अप्पर पोलीस अधिक्षक मुकूंद आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंध विभाग धाराशिवचे पोलीस निरिक्षक विकास राठोड, पर्यवेक्षण अधिकारी म्हणून पोलीस उपाधिक्षक सिद्धाराम म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार नेताजी अनपट, सिद्धेश्वर तावसकर, जाकेर काझी यांच्या पथकाने केली. दरम्यान, भ्रष्टाचारासंबंधी कांही तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंध विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.