नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पेटीएम पेमेंट्स बँकेवर ३१ जानेवारी रोजी आरबीआयने मोठी कारवाई केली आहे. यानंतर फास्टॅग, वॉलेट आणि इतर बँक अकाउंटमध्ये पैसे जमा करण्यावरही बंदी घालण्यात आली. आरबीआयने पेटीएमची बँकिंग सर्व्हिस २९ फेब्रुवारीनंतर बंद होणार आहे. आरबीआयने नियमांचे उल्लघंन केल्याबद्दल हे निर्बंध लावण्यात आले आहेत. यामागे प्रमुख कारण कुठलीही ओळख न दाखवता कोट्यवधी अकाउंट बनवणे हे आहे. या अकाउंटची केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली नव्हती. इतकेच नाही तर कुठलीही ओळख न दाखवता कोट्यवधी रुपयांची देवाण-घेवाण देखील करण्यात आली होती, ज्यामध्ये मनी लॉड्रिंग झाल्याचा संशय आहे.
आरबीआयने बंदी घालण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे पेटीएम पेमेंट्स बँक अंतर्गत एकच पॅन कार्डशी तब्बल १००० हून अधिक यूजर्सचे अकाउंट कनेक्ट करण्यात आले होते. यासह आरबीआय आणि ऑडिटर्स दोन्हीकडून करण्यात आलेल्या तपासात पेटीएम बँक नियमांचे पालन करत नसल्याचे समोर आले. महसूल सचिव संजय मल्होत्रा यांनी जर फंडस्मध्ये फेरफार केल्याचे काही पुरावे सापडले तर ईडी पेटीएम पेमेंट्स बँकेची चौकशी करेल, असे सांगितले.
आरबीआयच्या निर्देशांनंतर पेटीएमची मालक असणारी कंपनी वन ९७ कम्युनिकेशन्स लिमिटेडचे शेअर्स मागील दोन दिवसात ४० टक्के घसरले आहेत. शक्रवारी बीएसईवर स्टॉक २० टक्के घसरून ४८७.०५ रुपयांवर पोहोचला. दोन दिवसात कंपनी मार्केट कॅप १७,३७८.४१ कोटी रुपये घसरुन ३०,९३१.५९ कोटी रुपये झाला आहे.
पेटीएमच्या शेअर्स ट्रेडिंगवर बंधने
भारताच्या स्टॉक एक्सचेंज, बॉम्ब स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजने डिजीटल पेमेंट फर्म पेटीएमच्या शेअर्सच्या डेली ट्रेडिंगवर बंधने लागू केले आहेत. जी कमी करून १० टक्के करण्यात आले आहे. कंपनीचे शेअर मागील दोन दिवसात ४० टक्के कोसळल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
पेटीएमकडे ३५ कोटी ई-वॉलेट
पेटीएम पेमेंट्स बँकेकडे तब्बल ३५ कोटी ई-वॉलेट आहेत. यामध्ये तब्बल ३१ कोटी अॅक्टिव्ह नाहीत तर फक्त चार कोटी कोणच्याही अमाउंटशिवाय किंवा कमी अमाउंटसह सुरू आहेत. म्हणजेच मोठ्या संख्येने इनअॅक्टिव्ह अकाउंट आहेत. तसेच लाखो अकाउंटचे केवायसी अपडेट झालेले नाही, असेही सांगण्यात आले.