वॉशिंग्टन : युद्ध, अस्थिरता, महागाई, गरिबी अशा संकटाच्या गर्तेत जग अडकले आहे. अमेरिकेसारख्या बलाढ्य महाशक्तीवरही आर्थिक संकटाचे वारे घोंघावत आहेत. पुढील वर्षात लाखो अमेरिकन नागरिकांवर बेरोजगारीची कु-हाड कोसळण्याची शक्यता येथील काँग्रेसनल बजेट ऑफिसच्या (संसदीय अर्थसंकल्पी कार्यालय- सीबीओ) अहवालात व्यक्त केली आहे.
संसदीय अर्थसंकल्पी कार्यालय हे अमेरिकी सरकारच्या विधी व कायदे विभागातील एक बिगरसरकारी मध्यवर्ती संस्था आहे. अर्थसंकल्प आणि आर्थिक विश्लेषणाची माहिती ही संस्था संसदेला देते. ‘सीबीओ’च्या अहवालात २०२४ मधील अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत मरगळ येणार असल्याचे नमूद केले. वर्ष अखेरीस बेरोजगारीचा दर ३.९ टक्क्यांवरून ४.४ टक्क्यांपर्यंत वाढण्याचा अंदाज यात व्यक्त केला. लाखो अमेरिकन त्यांच्या नोक-या गमावतील, असा याचा अर्थ आहे. ‘करंट व् ू ऑफ द इकॉनॉमी फ्रॉम २०२३ टू २०२५’ या शीर्षकाच्या या अहवालात अमेरिकेतील आर्थिक स्थितीबद्दल अंदाज वर्तविला.
आर्थिक समायोजन व धोरणातील बदलांचा परिणाम म्हणून २०२३ मधील एकूण देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) २.५ टक्क्यांवरून २०२४ मध्ये १.५ टक्क्यांपर्यंत खाली येण्याचा अंदाजही व्यक्त केला आहे. ग्राहकांची क्रयशक्ती घटणे, अनिवासी गुंतवणूक कमी होणे व निर्यातीमधील घट अशा कारणांमुळे आर्थिक गाडा घसरण्याची शक्यता असल्याचे ‘सीबीओ’ने म्हटले.