नाशिक : माडसांगवी (नाशिक) येथील खासगी चराईच्या जमिनीचा वादग्रस्त व्यवहार चर्चेत आला आहे. यावरून ग्रामस्थांनी थेट मंत्री गिरीश महाजन यांचे नाव घेतले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महायुतीचा एक मंत्री जमिनीच्या व्यवहारात चर्चेत आला आहे. माडसांगवी येथील ५० एकर खासगी चराईच्या जमिनीचा विक्री व्यवहार परस्पर करण्यात आला आहे. यामध्ये जळगावचे व्यापारी सुनील झंवर यांनीही जमीन खरेदी केल्याचे बोलले जाते. त्यासाठी एका खाजगी कंपनीच्या नावाने व्यवहार करण्यात आला. झंवर हे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय असल्याचे बोलले जाते. यासंदर्भात नाशिकच्या जिल्हा न्यायालयात दाद मागण्यात आली आहे.
माडसांगवी (नाशिक) येथील परशुराम पेखळे, रवींद्र पेखळे, दत्तात्रय पेखळे, पंडितराव पेखळे, सोमनाथ पेखळे, ठकुबाई पेखळे, मंगला पेखळे, इंदुबाई कहांडळ, बेबी धुर्जड, कुसुम मुळक, सत्यभामा कसबे यांनी यासंदर्भात तक्रार केली आहे. या संदर्भात गावातील ९ जणांनी बनावट दस्तऐवज तयार करून सातबारा उता-यावर आपली नावे लावली. त्यासाठी शासकीय पदांचा दुरुपयोग करण्यात आला. त्यांच्यामार्फत सुनील झंवर यांनी एका कंपनीच्या नावाने ही जमीन खरेदी केली. त्यात पडद्यामागे मंत्री महाजन यांचा देखील अप्रत्यक्ष सहभाग असल्याचा त्यांचा दावा आहे.
यासंदर्भात तत्कालीन अप्पर जिल्हाधिकारी शेखर देसाई यांच्याकडे महसुली नियमानुसार तक्रार करण्यात आली होती. त्यावर सुनावणी होऊन फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र शासकीय यंत्रणेचा उपयोग दुरुपयोग आणि दबाव निर्माण करून ही जमीन परस्पर एका कंपनीला विक्री करण्यात आली, असे पेखळे कुटुंबीयांनी सांगितले. आता ही जमीन जळगावच्या अन्य एका विकासकाला विक्री करण्यात आली आहे. संबंधित विकास या जमिनीचे प्लॉट करून विक्री करण्याची तयारी करीत आहे.
यामध्ये मोठा आर्थिक व्यवहार झाल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे ग्रामस्थांनी त्याला विरोध करून आंदोलनाचा इशारा दिला आहे. याबाबत तक्रार केल्याने स्थानिक पोलिस ठाण्यातून पोलिस अधिकारी आपल्याला धमकावत आहेत. या जमिनीबाबत आपली काहीही तक्रार नाही, असे जबरदस्तीने लिहून घेण्यासाठी पोलिसांकडून दबाव टाकला जात आहे. या जमिनीचा बेनामी व्यवहार झाल्याचा दावा ग्रामस्थांच्या वतीने अॅड. अशोक अहिरे यांनी केला आहे. आमच्या हक्काची आणि चराईची जमीन परस्पर विक्री करून राजकीय दबाव टाकला जात आहे. या संदर्भात जिल्हा न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे. आपल्याला न्याय न मिळाल्यास जिल्हा न्यायालयाच्या समोरच ठिय्या आंदोलन करू असा इशारा या ग्रामस्थांनी दिला आहे.