पुणे : स्वारगेट बस स्थानकात घडलेली अत्याचाराची घटना शांततेत घडली असे विधान गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केल्यानंतर आता त्यावरून नवीन वादाला तोंड फुटले आहे. घटनेच्यावेळी पीडित तरुणीने कोणताही प्रतिकार केला नाही, असेही कदम यांनी पत्रकार परिषदेत बोलताना म्हटले होते. त्यावर आता विरोधी पक्षाकडून टीका केली जात आहे.
योगेश कदम यांच्या विधानावर ठाकरे गटाचे खासदार नेते संजय राऊत यांनी टीका केली आहे. संजय राऊत म्हणाले की, ते म्हणतात की आतमध्ये ( बस) हाणामारी झाली, शांतपणे बलात्कार पडला, त्यामुळे बाहेर कळले नाही, ही आमची गृहराज्यमंत्र्यांची भूमिका आहे. एका महिलेवर गाडीमध्ये जबरदस्ती होते, विनयभंग, बलात्कार होतो, आणि तिने स्ट्रगल केले नाही , हा त्यांचा शब्द आहे. तिने स्ट्रगल केले नाही त्यामुळे आम्हाला बाहेर कळले नाही.
तिचा गळा दाबला, तेोंड दाबले, तिच्यावर जबरदस्ती केली.आणि हे काय बोलतात, असे म्हणत राऊतांनी कदमांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. पीडितेने प्रतिकार केला नाही म्हणून बलात्कार झाला असे ते म्हणत आहे. पीडितेने स्ट्रगल करायला हवे होते असे कदम म्हणत आहेत, म्हणजे तिने काय करायला हवे होते? असा खोचक प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला आहे.
गृहराज्यमंत्री दिव्यच : संजय राऊत
आरोपीला पकडून पोलिस सरकारने उपकार केले का ? असा सवाल राऊत यांनी विचारला. एवलढंच नव्हे तर या अत्याचार प्रकरणावरून बोलताना गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी केलेल्या विधानामुळेही राऊत संतापले असून त्यांनी आक्रमकपणे भूमिका मांडली. आमचे गृहराज्यमंत्री म्हणजे दिव्यच आहेत अशा शब्दांत राऊतांनी कदम यांच्यावर टीका केली. कदम यांच्या वक्तव्यामुळे हे प्रकरण आता आणखी तापण्याची चिन्हे दिसत आहेत.
अत्यंत अशोभणीय : सुषमा अंधारे
मंत्रीपदावर असलेला व्यक्ती अशाप्रकारे बेजबाबदारपणे विधान करत असेल, पीडित महिलांचा अपमान करून त्यांच्यावर शंका उपस्थित केल्या जात असतील तर महाराष्ट्रातल्या महिला अन्याय झाल्यावर न्याय मागायला कशा जाणार? कदम यांनी केलेलं विधान हे अशोभनीय आहे, अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारे यांनी दिली आहे.