जैसलमेर : पाकिस्तानशी हेरगिरी केल्या प्रकरणात राजस्थान जैसलमेर जिल्ह्यातील जिल्हा रोजगार अधिकारी शकूर खान याला अटक झाली आहे. शकूर खान हा काँग्रेसच्या काळात कॅबिनेट मंत्र्याचा पीए होता. त्याच्या मोबाईलमध्ये पाकिस्तानच्या अनेक मोबाईल क्रमांक सापडले आहेत. या क्रमांकावर अनेक कॉल केले गेले आहेत. शकुरचे ज्योती मल्होत्रा हिच्याशी देखील संबंध होते असे उघडकीस आले आहे.
देशात भारत आणि पाकिस्तानमधील तणावानंतर हेरगिरीची एकामागून एक प्रकरणे बाहेर पडत आहेत. आता राजस्थानच्या जैसलमैरचे सध्याचे जिल्हा रोजगार अधिकारी शकूर खान याला अटक केली आहे. शकूर खान कांग्रेस सरकारमधील कॅबिनेट मंत्री शाले मोहम्मद यांचा खासगी सचिव होता, गेल्या काही वर्षांपासून त्याने सात वेळा पाकिस्तानचा प्रवास केला आहे. तो पाक दुतावासाच्या अधिका-यांच्या संपर्कात होता.शकूरचे कनेक्शन हिस्सार येथून जेरबंद झालेल्या युट्यूबर ज्योती मल्होत्रा हीच्याशी असल्याचे उघडकीस आले आहे.
भारतीय तपास यंत्रणांनी शकूर याच्या मोबाईलमधून अनेक संशयास्पद कागदपत्रे जप्त केली आहेत. शकूर देशाचे गोपनीय कागदपत्रे आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून संवेदनशील फोटो आणि व्हीडीओ पाकिस्तानमध्ये बसलेल्या एका हँडलरला पाठवत होता असा गुप्तचर यंत्रणांना संशय आहे. पोलिसांना त्याच्या मोबाईलमध्ये सुमारे एक डझन पाकिस्तानींचे मोबाईल नंबर सापडले आहेत. तो या नंबरवर कागदपत्रे आणि गुप्त माहीती पाठवत असे. पोलिसांनी त्यात काही कागदपत्रे जप्त केली आहेत, तर मोबाईल फोनमधून डिलीट केलेला डाटा पुन्हा मिळवण्यासाठी तो फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवला आहे.