मुंबई : प्रतिनिधी
राज्यात महायुतीचे सरकार सत्तेत येऊन जवळपास चार महिने झाले. मात्र, महायुतीच्या नेत्यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता अद्यापही होताना पाहायला मिळत नाही. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीच्या नेत्यांनी शेतक-यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, सत्तेत आल्यानंतर ही घोषणा हवेतच विरली. त्यामुळे विरोधकांसह शेतकरी नेते आक्रमक झाले असून, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी कर्जमाफीबद्दल राज्य सरकारने योग्य तो निर्णय घ्यावा अन्यथा मंत्र्यांना राज्यात फिरू देणार नाही, असा इशारा दिला.
शेतक-यांना कर्जमाफीची आशा लागलेली असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी शेतक-यांची कर्जमाफी होईल की नाही, याबाबत स्पष्ट सांगितले. शेतक-यांनी आपापले कर्ज भरण्याचे सूतोवाच अजित पवार यांनी केले. दरम्यान, यावरूनच आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते तथा माजी खासदार राजू शेट्टी हे आक्रमक झाले. महायुती सरकारने शेतक-यांच्या कर्जमाफीबाबत योग्य तो निर्णय घ्यावा अन्यथा मंत्रिमंडळातील मंत्र्यांना राज्यात फिरू देणार नाही’, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे. ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते.
एक तर वेळेत कर्ज न भरल्याप्रकरणी व्याज सवलत मिळत नाही. या शेतक-यांचा समावेश थकबाकीदारांमध्ये होतो. तसेच शेतक-यांनी ते कर्ज भरले नाही म्हणून पुन्हा कर्ज मिळणार नाही. अशा पद्धतीची शेतक-यांची कोंडी झाली आहे. मात्र, आम्ही हे सहन करणार नाहीत. येत्या एका आठवड्यात राज्य सरकारने याबाबतची भूमिका जाहीर करावी अन्यथा महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळात असणा-या तीनही पक्षाच्या मंत्र्यांना आम्ही राज्यात फिरू देणार नाही, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला.