16.2 C
Latur
Tuesday, January 21, 2025
Homeमहाराष्ट्रआरोग्य मंत्रालय भ्रष्टाचाराचे कुरण

आरोग्य मंत्रालय भ्रष्टाचाराचे कुरण

मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील आरोग्य व्यवस्था व आरोग्य यंत्रणेबाबत कमालीचे गोंधळाचे चित्र निर्माण झाले आहे. अलीकडे आरोग्य मंत्रालय हे भ्रष्टाचाराचे कुरण, अनियमित बदल्या-बढत्यांचा व त्यातून आर्थिक उलाढालीचा विभाग बनला आहे. या विभागात फक्त पैसाच बोलतो व पैसाच काम करतो, असे बोलले जाते, असा गंभीर आरोप करणारे पत्र शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हिवाळी अधिवेशनापूर्वी लिहिले. यामुळे अधिवेशनात आरोग्य मंत्रालयाच्या कथित भ्रष्टाचारावरून ठाकरे गटाचे आमदार आक्रमक होण्याची शक्यता आहे.

आरोग्य विभागाच्या संपूर्ण खात्यात असंतोष आहे व त्याचा फटका गरिबांना बसत आहे. ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरण हे सरळ सरळ आरोग्य विभागाशी संबंधित आहे. पोलिसांइतकेच संबंधित खात्याचे मंत्री व अधिकारीही त्यास जबाबदार आहेत. माझ्या समोर आरोग्य खात्यातील भ्रष्टाचाराची, अनियमिततेची प्रकरणे पुराव्यासह आली आहेत व हा सगळाच प्रकार गंभीर आणि राज्याच्या प्रतिष्ठेला काळिमा फासणारा आहे. नियमबा बढत्या व बदल्या हा एक मोठा उद्योग आरोग्य विभागात बनला असून या उद्योगाचे संचालक संबंधित खात्याचे मंत्री तानाजी सावंत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला.

भ्रष्टाचाराचे भक्कम पुरावे
आरोग्य खात्यातील भ्रष्टाचाराबाबत माझ्याकडे भक्कम पुरावे आहेत. आपल्या कार्यालयातील जबाबदार व्यक्तीचे नाव कळवा. त्याच्या हाती पुरावे सुपूर्द करण्यास मला आनंदच होईल. आरोग्य खात्यातीत भ्रष्टाचाराची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी संजय राऊत यांनी पत्रातून केली. यावर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी यासंदर्भात सभागृहात विचारलेल्या प्रश्नांना त्यांच्याच भाषेत उत्तरे दिली जातील, असे म्हटले. त्यामुळे या मुद्यावरून सभागृहात खडाजंगी होण्याची शक्यता आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR