24.6 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeसोलापूरअल्पवयीन मुलींना केले पालकांच्या स्वाधीन

अल्पवयीन मुलींना केले पालकांच्या स्वाधीन

सोलापूर विभागातील तिकीट तपासणी कर्मचा-यांची सतर्कता

सोलापूर : सोलापूर ते मनमाड येथे (१२६२७) बंगळुरू-नवी दिल्ली कर्नाटक एक्सप्रेस या ट्रेनमध्ये कर्त्यव्यावर स्थित असणारे सोलापूर रेल्वे विभागातील टीटीआय संतोष कुमार (प्रवासी तिकीट निरीक्षक) यांच्याकडे एक चिंतेत असणा-या प्रवाशाने संपर्क साधला आणि या एका घटनेमुळे अल्पवयीन मुलींना पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. तर यात घडलेली घटना अशी की बंगळुरू- नवी दिल्ली कर्नाटक एक्स्प्रेस मध्ये दोन अल्पवयीन मुली रडत असून त्यांना जबरदस्तीने दिल्लीला नेण्यात येत असल्याचे एका प्रवाशाला समजले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सदरच्या प्रवाशाने तात्काळ संतोष कुमार आणि सूर्यवंशी, सीटीआय (मुख्य तिकीट निरीक्षक) अहमदनगर यांना घटना सांगितली.

पुढे तिकीट तपासणी कर्मचा-यांनी तात्काळ आरपीएफ आणि नियंत्रण यांना सदरील घटनेची संपूर्ण वर्णनात्मक माहिती दिली. दरम्यान रेल्वे कर्मचा-यांनी अधिक माहिती गोळा करण्यासाठी मुलींशी संवाद साधला आणि त्यांच्याशी ओळखीची पुष्टी करण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला. पुढे सदरची ट्रेन बेलापूर स्थानकावर पोहोचल्यानंतर, पुढील तपास आणि आवश्यक कारवाईसाठी मुलींना आरपीएफकडे सुरक्षितपणे सोपवण्यात आले.

संतोष कुमार आणि सूर्यवंशी यांनी दाखवलेल्या समर्पणामुळे आणि अधिका-यांनी दिलेल्या जलद प्रतिसादामुळे मुलींना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात रेल्वे प्रशासनाला यश आले. शिवाय प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाची वचनबद्धता देखील पुन्हा पटवून दिली. सदरच्या घटनेत सोलापूर विभाग तिकीट तपासणी कर्मचा-यांच्या धाडसी आणि सतर्कतेबद्दल सोलापूर रेल्वे विभागाचे विभागीय व्यवस्थापक यांनी कौतुक केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR