28.5 C
Latur
Sunday, July 6, 2025
Homeराष्ट्रीयचमत्कारच! विमान अपघातातून एकटाच जिवंत सापडला

चमत्कारच! विमान अपघातातून एकटाच जिवंत सापडला

प्रवासी रमेश विश्वासकुमार बचावले

अहमदाबाद : गुरुवारी दुपारी लंडनसाठी उड्डाण घेतलेले एअर इंडियाचे विमान टेकऑफनंतर काही मिनिटांतच दुर्घटनाग्रस्त झाले. अहमदाबाद विमानतळापासून काही अंतरावरील मेघानीनगर परिसरात हे विमान कोसळले. हा अपघात इतका भयंकर होता की दुर्घटनेनंतर विमान जळून खाक झाले. त्याशिवाय ज्या इमारतीला विमान धडकले त्या इमारतीलाही आग लागली. या विमानात २ पायलट, १० क्रू मेंबर्ससह २३० प्रवासी होते. भीषण दुर्घटनेत कुणीही वाचण्याची शक्यता फार कमी असल्याचं सांगण्यात आले. परंतु आता समोर आलेल्या माहितीनुसार विमान अपघातातून एक प्रवासी सुखरूप असल्याचे पुढे आले आहे.

या दुर्घटनेबाबत अहमदाबाद पोलिस आयुक्त जी.एस मलिक यांनी एएनआयला दिलेल्या माहितीनुसार, एअर इंडियाच्या दुर्घटनाग्रस्त विमानातील एक प्रवासी जिवंत आढळला आहे. हा प्रवासी ए११ या सीट नंबरवर होता. त्याला सध्या उपचारासाठी हॉस्पिटलला नेले आणि त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेतील मृतांच्या आकड्याबाबत अद्याप सांगू शकत नाही. मृतांची संख्या वाढण्याचीही शक्यता आहे कारण विमान नागरी वस्तीत कोसळले आहे असे त्यांनी म्हटले.

माहितीनुसार, या भीषण अपघातात वाचलेल्या प्रवाशाचे नाव रमेश विश्वासकुमार असे आहे, ते ४० वर्षाचे मूळ भारतीय असलेले ब्रिटनचे नागरिक आहेत. या दुर्घटनेतून विश्वास रमेश वाचल्याने हा चमत्कारच मानला जात आहे. रमेश विश्वासकुमार यांचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अपघातातून बचावलेल्या रमेश यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी काही लोकांशी संवाद साधला. ज्यात एक जोरदार स्फोट झाला. चहुबाजूने आग लागली होती. त्यानंतर मला रुग्णवाहिकेतून हॉस्पिटलला आणले. मी जिवंत आहे यावर मला विश्वास बसत नाही. हे चमत्कारापेक्षा कमी नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

दरम्यान, रमेश विश्वासकुमार हे गुजरातजवळील केंद्रशासित प्रदेश दीव येथील येथे आले होते. ते एअर इंडियाच्या विमानाने आज लंडनला जात होते. परंतु जेव्हा हे विमान क्रॅश झाले तेव्हा आपत्कालीन दरवाजातून त्यांनी उडी घेतली असल्याचे बोलले जाते. एअर इंडियाच्या या दुर्घटनेत जवळपास २०० हून अधिक प्रवासी मृत झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यात टाटा ग्रुपकडून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी १ कोटींची मदत करण्याचे जाहीर केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR