27.1 C
Latur
Tuesday, May 13, 2025
Homeमहाराष्ट्रससूनमधील कर्मचारी गायब

ससूनमधील कर्मचारी गायब

पोलिस सीसीटीव्ही फूटेज तपासणार पुणे हिट अ‍ॅन्ड रन प्रकरण

पुणे : पुण्याच्या कल्याणीनगर परिसरात झालेल्या पुणे हिट अ‍ॅन्ड रन प्रकरणात आता एका वेगळ्याच ट्रॅकवर जाऊन पोहोचले आहे. सुरुवातीला फक्त एक ड्रिंक अँड ड्राईव्ह अपघात असे स्वरुप असलेल्या या प्रकरणाने पुण्यातील संपूर्ण शासनयंत्रणेची पोलखोल केली आहे. या प्रकरणामुळे पुण्यातील पोलिस, आरोग्य आणि उत्पादन शुल्क विभागाच्या कारभाराची काळी बाजू समोर आली आहे.

सध्या ससून रुग्णालय हे पुणे अपघात प्रकरणाचे केंद्रस्थान बनले आहे. याच रुग्णालयातील दोन डॉक्टरांनी मुख्य आरोपी असलेल्या धनिकपुत्राच्या ब्लड सॅम्पलची अदलाबदल केल्याची माहिती काल समोर आली होती. त्यानंतर आज आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ससून रुग्णालयाच्या रक्त चाचणी विभागातील एक कर्मचारी गायब असल्याचे सांगितले जात आहे. हा कर्मचारी नेमका कोण आहे आणि याप्रकरणात त्याची नेमकी भूमिका काय होती?, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.

प्राथमिक माहितीनुसार, ससूनच्या रक्त चाचणी विभागातील हा कर्मचारी सध्या नॉट रिचेबल असल्याची चर्चा आहे. पोलिसांकडून कोणीही बेपत्ता नसल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात पोलिस या कर्मचा-याचा शोध घेत असल्याचे समजते. पोलिसांनी ससून रुग्णालयातील पुणे अपघातानंतरचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. हे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडून बारकाईने पाहिले जाईल. त्यानंतर रक्त चाचणी विभागाच्या परिसरात असणा-या व्यक्तींची चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणा-या सर्व संबंधितांना आम्ही चौकशीसाठी बोलावणार आहोत. जो कर्मचारी चौकशीला येणार नाही, त्याला जबरदस्तीने आणले जाईल, अशी माहिती पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने दिली आहे.

एसआयटीप्रमुखांनी केली रुग्णालयाची चौकशी
तत्पूर्वी ससून हॉस्पिटलमधील वैद्यकीय तपासणी आणि उपचारासंदर्भात झालेल्या गैरप्रकाराच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या एसआयटी समितीच्या प्रमुख डॉ. पल्लवी सापळे या मंगळवारी सकाळी रुग्णालयात पोहोचल्या. त्यांच्याकडून ससूनच्या रक्त चाचणी विभागातील कार्यपद्धती कशी आहे, याची माहिती घेतली जाईल. त्याआधारे ससूनच्या डॉक्टरांनी धनिकपुत्राची ब्लड सॅम्पलची अदलाबदल कशी केली?, याविषयीचा अहवाल डॉ. पल्लवी सापळे यांच्याकडून सादर केला जाईल.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR