पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अण्णा बनसोडे यांची विधानसभा उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. पिंपरी-चिंचवड शहराला २५ वर्षानंतर मंत्रिपद दर्जा असणा-या पदावर संधी मिळाल्याने पवार गटामध्ये चैतन्याचे वातावरण आहे.
पिंपरी-चिंचवड शहरामध्ये शहराचे नेते प्राध्यापक रामकृष्ण मोरे यांना १९९९ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात शालेय शिक्षण, सांस्कृतिक मंत्री म्हणून संधी मिळाली होती. त्यानंतर २००३ मध्ये प्राध्यापक मोरे यांचे निधन झाले आणि काँग्रेसची ताकद कमी होण्यास सुरुवात झाली. दुसरीकडे काँग्रेसचे मोहरे फोडून अजित पवार यांनी राष्ट्रवादीची ताकद वाढविण्यास सुरुवात केली. पंधरा वर्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता होती. मात्र, पवार यांनी कुणालाही मंत्रिपदाची संधी उपलब्ध दिली नव्हती.
मंत्रिपदाची केवळ चर्चाच
हवेलीचे आमदार विलास लांडे, चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप आणि पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांना संधी मिळाली होती. पंधरा वर्षांपासून लांडे आणि जगताप यांच्या नावाची मंत्रिमंडळ विस्ताराच्या वेळी केवळ चर्चा होत असे. जगताप यांचे देहावसान झाले तरी त्यांना मंत्रिपदाची संधी पवारांनी दिली नव्हती. त्यामुळे राष्ट्रवादीत नाराजी होती.