24.3 C
Latur
Wednesday, January 8, 2025
Homeमहाराष्ट्रआमदार धस यांनी घेतली उपमुख्यमंत्री पवारांची भेट

आमदार धस यांनी घेतली उपमुख्यमंत्री पवारांची भेट

मुंडेंच्या राजीनाम्याचा आग्रह थेट पक्षाध्यक्षांकडे?

मुंबई : बीड जिल्ह्यातील भाजप आमदार सुरेश धस यांनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि पवनचक्की खंडणी प्रकरणावरून आमदार धस यांच्याकडून वारंवार राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांना लक्ष्य करण्यात येत आहे. तसंच मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मुद्यावरून धस यांनी जाहीर भाषणातून अजित पवारांनाही लक्ष्य केले होते. या पार्श्वभूमीवर सुरेश धस यांनी घेतलेली अजित पवारांची भेट महत्त्वाची मानली जात आहे.

बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात विविध पतसंस्थांमध्ये मोठा घोटाळा झाला आहे. बीड जिल्ह्यातील सव्वालाख आणि मराठवाड्यातील एकूण १६ लाख ठेवीदारांचे पैसे बुडाले आहेत. या लोकांना मदत मिळवून देण्यासाठी केंद्रासोबत बोलावे, यासाठी मी अजित पवारांची भेट घेत आहे. याबाबत अधिका-यांची बैठक लावावी, अशी माझी मागणी आहे असे आमदार सुरेश धस यांनी सांगितले आहे. दरम्यान बीड जिल्ह्यात नेमके काय चाललंय, हे अजित पवारांपर्यंत पोहोचू दिले जात नाही. त्यांची भेट घेऊन मी जिल्ह्यातील सर्व माहिती त्यांना देईन असेही सुरेश धस यांनी काल सांगितले होते.

पवनचक्की कंपनीकडे खंडणी मागण्यासाठी धनंजय मुंडे यांच्या सरकारी बंगल्यावर बैठक झाली होती आणि नंतर निवडणुकीसाठी या कंपनीकडून ५० लाख रुपये घेण्यात आले, असा आरोप सुरेश धस यांनी पुण्यातील आक्रोश मोर्चावेळी केला आहे. धनंजय मुंडेंवर आरोप करताना तारखांचा उल्लेख करत सुरेश धस म्हणाले की, १४ जून रोजी अवादा कंपनीचे अधिकारी आणि वाल्मीक कराड, नितीन बिक्कड यांची मुंडेंच्या परळीतील बंगल्यावर बैठक झाली. या बैठकीनंतर थेट धनंजय मुंडे यांची भेट घेण्यासाठी अवादा कंपनीच्या शुक्ला नावाचा अधिकारी मुंडे यांचे स्वीय सहाय्यक प्रशांत जोशी यांच्याकडे प्रयत्न करत होते.

मला डावलून थेट धनंजय मुंडेंची भेट घेण्याचा प्रयत्न केल्याने ही बाब वाल्मीक कराडला खटकली. त्यामुळे वाल्मीकने जोशीला खडसावले आणि त्यानंतर १९ जून रोजी अवादा कंपनी आणि आय एनर्जी या कंपनीच्या अधिका-यांची धनंजय मुंडे यांच्या मुंबईतील बंगल्यावर बैठक झाली. या बैठकीत कंपनीच्या अधिका-यांकडे तीन कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली. त्यानंतर कंपनीच्या अधिका-यांनी आपल्या वरिष्ठांना ही बाब फोनवर सांगितली. वरिष्ठांनी तीन कोटींऐवजी दोन कोटी रुपये देण्यास सहमत दाखवली. त्यानंतर निवडणुकीसाठी आता लगेच ५० लाख रुपये द्या, अशी मागणी कंपनीकडे करण्यात आली आणि कंपनीने यांना ५० लाख रुपये दिले. हे पैसे तेव्हा धनंजय मुंडेंनी घेतले की वाल्मीक कराड याने हे मला माहीत नाही. धनंजय मुंडे यांच्या सरकारी बंगल्यावर खंडणीसाठी बैठका झाल्या, असा गंभीर आरोप सुरेश धस यांनी केला होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR