नवी दिल्ली : शिवसेना आमदार अपात्र प्रकरण, तसेच शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाची सुनावणी पुन्हा पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाविरोधात ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर उद्या म्हणजे १४ मे रोजी सुनावणी होणार होती आणि निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिल्या प्रकरणी ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर १७ मे रोजी सुनावणी होणार होती. मात्र आता या दोन्ही प्रकरणांची सुनवणी जुलै महिन्यात होण्याची शक्यता आहे.
या आठवड्यात सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड हे ब्राझील दौ-यावर जाणार असल्याने ते कामकाजात नसतील. या दोन्ही प्रकरणाच्या सुनावण्या सीजेआय यांच्या पिठासमोर होत्या. मात्र ते सुट्टीवर असल्याने या सुनावण्या होणार नाहीत, अशी माहिती समोर येत आहे. मागच्या अनेक महिन्यांपासून या प्रकरणी सुनावणी झालेली नाही. त्यामुळे या प्रकरणी निकाल विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लागण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर निकाल आल्यानंतर काय-काय घडामोडी घडतात? ते पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर सुनावणी दिल्यानंतर ठाकरे गटाने पुन्हा सुप्रीम कोर्टाचे दार ठोठावले आहे. सुप्रीम कोर्टात या प्रकरणावर सुनावणी सुरु आहे. संबंधित प्रकरण कोर्टात अजूनही प्रलंबित आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात दोन वर्षांपूर्वी मोठा राजकीय भूकंप घडून आला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षात मोठे बंड पुकारले. यानंतर त्यांनी भाजपसोबत हातमिळवणी करत महायुतीचे सरकार घडवून आणले. आपणच खरी शिवसेना असल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने केला. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांचा गट केंद्रीय निवडणूक आयोगातील कायदेशीर लढाई जिंकली. तर सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर सुनावणी घेऊन निकाल देण्याचे आदेश दिले.
यानंतर विधानसभा अध्यक्षांनी दिलेला निकाल ठाकरे गटाला मान्य नसल्याने ठाकरे गट पुन्हा सुप्रीम कोर्टात गेला. तर दुसरीकडे शिवसेनाही ठाकरे गटाचे आमदार अपात्र का नाहीत? या मुद्यावरूनावरुन सुप्रीम कोर्टात धाव घेतलीय. दोन्ही गटांच्या याचिकांचे प्रकरण आता सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहेत. याच प्रकरणाबाबत आता एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.