मुंबई : प्रतिनिधी
मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा एकदा लोकसभेत मांडण्यासाठी एनडीएकडून फोडाफोडीचे सत्र सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षांचे खासदार सोमवारी (उद्या) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेणार आहेत. या भेटींवरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. त्यातच आज राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकत्रित मुंबई ते कोल्हापूर असा प्रवास केला. त्यांच्यासमवेत विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरही उपस्थित होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे.
गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादीच्या मिलनाचे तसेच केंद्रामध्ये सुप्रिया सुळे यांच्या मंत्रिपदाची चर्चा रंगली आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून या चर्चा फेटाळून लावण्यात आल्या. परंतु राज्यात आणि दिल्लीत घडणा-या घडामोडी अनेक शक्यतांना वाट करून देत आहेत. जंतरमंतरवरील आंदोलनादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी अभिजित दिपके यांची भेट घेतली होती. मात्र, अभिजित दिपके यांच्या भेटीनंतर लगेचच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात या भेटीची चांगली चर्चा रंगली होती.
त्यानंतर आता राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे सर्वच खासदार उद्या सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. पक्षाचे सर्वच खासदार मोदींना भेटणार असल्याने एडीए सरकारच्या आगामी रणनितीच्या दृष्टीने शरद पवार पक्षाचे खासदार एनडीए सरकारला साथ तर देणार नाहीत ना, अशी चर्चा रंगली. यासंबंधीच्या चर्चा कमी होतात न होतात तोच आज शरद पवार पक्षाचे मोठे नेते जयंत पाटील यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत मुंबई ते कोल्हापूर असा प्रवास केला. त्यामुळे भाजपसोबत शरद पवार पक्षाची जवळीक वाढल्याची चर्चा रंगली आहे.
जयंत पाटील यांच्या
अर्थमंत्रिपदाचीही चर्चा
गेल्या काही महिन्यांपासून राज्याच्या राजकारणामध्ये जयंत पाटील यांच्या अर्थमंत्रिपदाची चर्चा रंगली आहे. इतकेच नव्हे तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित केल्यानंतर जयंत पाटील यांच्याकडे राष्ट्रवादीकडील अर्थमंत्रिपद दिले जाईल, असे बोलले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर तर हालचाली सुरू नाहीत ना, अशीही चर्चा आहे.
















