सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत अक्कलकोटचे भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी नेतृत्व स्वीकारले आहे. त्यासाठी पक्षातील दोन वरिष्ठ आमदार देशमुखांना डावलून काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने आणि जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे यांच्याशी युती केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार आपण काँग्रेस नेत्यांसोबत युती केल्याचेही कल्याणशेट्टी यांनी स्पष्ट केले आहे. काँग्रेस-भाजपच्या या पॅनेलची येत्या १६ एप्रिल रोजी घोषणा करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली हे काँग्रेस-भाजपचे पॅनेल काम करणार आहे, असे माजी आमदार दिलीप माने यांनीही स्पष्ट केले आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी भाजपचे आमदार तथा जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने, काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, राजशेखर शिवदारे, बाळासाहेब शेळके, श्रीशैल नरोळे, हरीश पाटील, शहाजी पवार, अविनाश महागावकर आदी नेते एकत्र आले आहेत. या वेळी सोलापूर शहर मध्य मतदारसंघाचे आमदार देवेंद्र कोठेही उपस्थित होते.
आमदार सुभाष देशमुख यांच्याशी चर्चा केली आहे. ही काही पक्षीय निवडणूक नाही. आमची विचारधारा एक आहे. पण, मतदारसंघाची भौगोलिक रचना वेगळी आहे, त्यामुळे थोडीशी गडबड होत आहे. आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत.आमच्या प्रयत्नाला यश येईल असा आशावादही आ. कल्याणशेट्टी यांनी व्यक्त केला. सुभाष देशमुख जरी आमच्यासोबत आले तर निवडणूक ही 99 टक्के लागणारच आहे. निवडणूक लागणाच ह्या हिशेबानेच आम्ही कामाला लागलो आहे. सुभाष देशमुख यांच्यासोबत कधीही अंतर राहणार नाही.
सुभाष देशमुख यांनी आमच्यासोबत यावे, अशी आमची इच्छा आहे. पण संख्या एवढी झाली आहे की सगळ्याच्या मनासारख्या जागा मिळूच शकत नाहीत. ही निवडणूक भाजप विरुद्ध भाजप अशी नाही. देवेंद्र फडणवीस यांच्याशिवाय इतर कोणत्याही नेत्याशी माझे बोलणे झालेले नाही. आम्ही मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली लढणार. ते सांगतील तोच निर्णय आमच्यासाठी शेवटचा असणार आहे.दक्षिण सोलापूर तालुक्यातील 36 गावे अक्कलकोट मतदारसंघात येतात कल्याणशेट्टी यांचा या निवडणुकीत मोठा सहभाग आहे.
दोन्ही देशमुख आमचे नेते
दोन्ही देशमुख आमचे नेते आहेत. पण त्यांची अडचण अशी झाली आहे की त्यांच्या मतदारासंघातील कार्यकर्त्यांनी फार्म भरलेले आहेत.एवढ्या सगळ्यांना एकत्रित केल्यानंतर प्रत्येकाच्या कार्यकर्त्यांना न्याय देता येणार नाही. त्यातून मार्ग काढण्याचा आमचा प्रयत्न आहे,असेही कल्याणशेट्टी यांनी सांगितले.
गोरे मित्र म्हणून जेवायला आले
पालकमंत्री जयकुमार गोरे हे मित्र म्हणून माझ्या घरी जेवायला आले होते. आम्ही काही राजकीय चर्चा केली नाही. ते चार ते पाच वेळा सोलापूरला आले होते. मात्र, मित्र असल्याने मी त्यांना जेवायाला बोलवले होते. एवढचं त्यात होतं. दुसरं काहीही चर्चा त्या ठिकाणी झालेली नाही.
मुख्यमंत्र्यांच्या विचारानेच घेतला निर्णय : दिलीप माने
आम्ही सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवत आहोत. मुख्यमंत्र्यांची आम्हाला गरज आहे. बिनविरोधसाठी प्रयत्न करो. त्यांना अधिकार दिले आहेत. जे सोबत येतील, त्यांना सोबत घ्या. आमची काय अडचण नाही. आ. कल्याणशेट्टी जो निर्णय घेतील, त्यासोबत आम्ही असणार आहोत. शेतकरी हिताच्या दृष्टीने सोलापूर बाजार समिती राष्ट्रीय बाजार समिती होणार असेल तर आमची काहीही हरकत नाही. मुख्यमंत्र्यांनी सांगितले तर आम्ही लगेच ठराव देऊ.
ही पक्ष निवडणूक नाही : सुरेश हसापुरे
गेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत विजयकुमार देशमुख हे आमच्या सोबत होते. डी सी सी बँक, मार्केट कमिटी या निवडणुका पक्षीय नसतात त्यामुळे आम्ही एकत्र येऊन निवडणुका लढवत असल्याचे मत सुरेश हसापुरे यांनी व्यक्त केले.