धाराशिव : प्रतिनिधी
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज तुळजापूरच्या पवित्र नगरीत आले आहेत. यानिमित्त शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे आमदार कैलास पाटील यांनी फेसबुक पोस्टद्वारे मुख्यमंत्र्यांना उपरोधिक टोला लगावला आहे.
आमदार कैलास पाटील यांनी आपल्या पोस्टमध्ये मुख्यमंत्र्यांचे स्वागत करताना लिहिले आहे की,
‘‘मुख्यमंत्री मा. ना. देवेंद्र फडणवीसजी, महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या पावन नगरीत आपले मन:पूर्वक स्वागत!’’
पुढे त्यांनी फडणवीस यांना त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळातील एक महत्त्वपूर्ण घोषणा आठवण करून दिली आहे. कैलास पाटील यांनी नमूद केले की, मुख्यमंत्रिपदी आल्यानंतर देवेंद्र फडणवीस प्रथमच धाराशिव जिल्ह्यात येत आहेत. यानिमित्ताने त्यांनी फडणवीस यांना निवडणुकीच्या प्रचारावेळी दिलेली कर्जमाफीची वचनबद्धता पुन्हा एकदा स्मरण करून दिली.
आमदार कैलास पाटील यांनी आपल्या पोस्टमध्ये पुढे लिहिले आहे की, ‘निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आपण शेतक-यांचा सातबारा कोरा करण्याची घोषणा केली होती. तसा निर्णयही आपल्या तत्कालीन सरकारने घेतला असल्याचे शब्द तुमचेच होते. माझ्या धाराशिवसह तमाम महाराष्ट्रातील शेतक-यांनी आपल्या या शब्दावर विश्वास ठेवला आणि आपल्या पदरी भरभरून यश दिले. आता त्या शब्दाला जागण्याची नैतिक जबाबदारी तुमचीच आहे.’
शेतक-यांच्या आर्थिक अडचणी आणि कर्जाच्या संकटातून मुक्ती मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण कर्जमाफीची घोषणा करण्याची गरज असल्याचे आमदार कैलास पाटील यांनी ठामपणे मांडले आहे. त्यांनी स्पष्ट केले की,
‘आई तुळजाभवानी देवीच्या पवित्र दरबारातून आपण संपूर्ण कर्जमाफीची घोषणा कराल आणि आपल्या शब्दाला जागाल, अशी आशा धाराशिव जिल्ह्यासह महाराष्ट्रातील तमाम शेतक-यांना लागून आहे.’
तसेच, शेतक-यांविषयी आपले प्रेम आणि कर्तव्य सिद्ध करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आपल्या घोषणेची तातडीने अंमलबजावणी करावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.