नागपूर : गेल्या काही दिवसांपूर्वी पुण्यातील ससून रुग्णालतून आरोपी ललित पाटील ड्रग्ज रॅकेट चालवत असल्याचे प्रकरण समोर आले होते. ललित पाटील याला पोलिसांनी ताब्यात घेऊन आता चौकशी सुरू केली आहे. आता हे प्रकरण हिवाळी अधिवेशनात चांगलेच गाजणार आहे. पुण्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सरकारचे लक्ष वेधले आहे.
आमदार रवींद्र धंगेकर यांनी विधान भवन परिसरात ललित पाटील याला संरक्षण देणा-या मंत्र्यांवर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून आमदार धंगेकर यांनी ही मागणी लावून धरली आहे. यामुळे आता हिवाळी अधिवेशनातही या मुद्यावरून राजकीय वातावरण तापणार असल्याचे दिसत आहे.
ससून रुग्णालयातील तत्कालीन अधिष्ठाता यांच्यावर असलेला राजकीय वरदहस्त या प्रश्नाकडे आमदार धंगेकरांनी लक्ष वेधले आहे. यावेळी माध्यमांसोबत बोलताना आमदार रवींद्र धंगेकर म्हणाले, ललित पाटील या आरोपीने ससून रुग्णालयात उपचार घेत असताना ड्रग्ज रॅकेट चालवले आहे. याबाबत आम्ही कारवाईची मागणी केली आहे.
ललित पाटील याला नऊ महिने चांगली सेवा दिली. पोलिस, डॉक्टरांशी संगनमत ठेवून त्याने अवैध धंदा सुरू ठेवला. यात त्याने करोडो रुपयांचा व्यवहार केला. आम्ही आवाज उठवूनही संजीव ठाकूर यांना अटक केलेली नाही, संजीव ठाकूर यांना अटक झाल्यानंतर ज्या, ज्या मंत्र्यांनी फोन केला त्याचा तपास झाला पाहिजे, कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी आमदार धंगेकर यांनी केली.
हातात स्टेथोस्कोप, अंगावर अॅप्रन…
रवींद्र धंगेकर हे स्टेथोस्कोप आणि अॅप्रन घालून डॉक्टरांच्या वेशभूषेत विधानभवनात पोहोचल्यावर त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तसेच, त्यांच्या अॅप्रनवर ‘ललित पाटील याला संरक्षण देणा-या मंत्र्यांवर कारवाई झालीच पाहिजे’ असे लिहिण्यात आल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे मागील काही दिवसांपासून ललित पाटील प्रकरणात आक्रमक होणारे ललित पाटील आता अधिवेशनात देखील आक्रमक भूमिका घेताना पाहायला मिळण्याची शक्यता आहे.