16.5 C
Latur
Monday, January 6, 2025
Homeमहाराष्ट्र‘मनसे’ला हेतूू आहे ना दिशा

‘मनसे’ला हेतूू आहे ना दिशा

मुंबई : तुमच्यासारखे कार्यकर्ते मरमर मेहनत करतात, त्या मेहनतीला काही अर्थ राहत नाही. पराभव ज्यांच्या जिव्हारी लागतो तोच इतिहास घडवू शकतो. तुम्ही ज्या पक्षातून आलात त्याला ना हेतूू आहे ना दिशा असे भाष्य करत उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता मनसे प्रमुख राज ठाकरे यांना खोचक टोला लगावला आहे. घाटकोपर येथील मनसे कार्यकर्त्यांनी आज ठाकरे गटात प्रवेश केला.

या पक्षप्रवेशावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, संपूर्ण मुंबई बरबटून टाकली आहे एक है तो सेफ है..आता हाच प्रश्न मला मराठी माणसांना विचारायचा आहे. उद्याची मुंबई आपली राहणार आहे का? शहरात असे बरेच गृहनिर्माण प्रकल्प आहेत जिथे आपल्या हक्काची मुंबई डोळ्यादेखत ओरबडून नेली जातेय अशावेळी आपण षंढ म्हणून बघत बसणार का? तुम्ही कोणत्या पक्षातून आलात त्याबद्दल मला बोलायचे नाही पण पक्ष स्थापन केल्यापासून पक्षाला काही हेतू लागतो. दिशा लागते ती काहीच नाही. अशावेळी तुमच्यासारखे कार्यकर्ते तिथे मरमर मेहनत करतात. त्या मेहनतीला काही अर्थ राहत नाही असा निशाणा त्यांनी मनसेवर साधला.

तसेच १५ दिवसांपूर्वीच निकाल लागला, निकाल लागल्यानंतर तुम्ही शिवसेनेत येताय. जे जिंकलेत त्यांच्याकडे जल्लोष नाही तुम्ही इथे जल्लोषात प्रवेश करत आहेत. जिंकलेल्यांना त्यांच्या विजयावर विश्वासच बसत नाही म्हणजेच त्या विजयात काहीतरी घपला आहे. बरेच घोटाळे आहेत. तुम्ही सगळे एकत्र आलात ते योग्य वेळी आला. जिंकल्यानंतर सगळे येतात पण हरल्यानंतर कुणी येत नाही. ज्यांना पराभवाची खंत असते. ज्यांना पराभव जिव्हारी लागतो तोच उद्या इतिहास घडवू शकतो. आपल्याला उद्याचा इतिहास घडवायचा आहे. आज तुम्ही सगळे शिवसेनेत आलात.

मी शिवसेना एकच मानतो. शिवसेना हे नाव निवडणूक आयोगाला दुस-या कुणाला देण्याचा अधिकार नाही हे मी उघडपणे तेव्हाही सांगितले आजही सांगतोय. फक्त निशाणी बदलली आहे. निशाणी बदलल्यानंतरही आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रात मी फिरत होतो तेव्हा सर्वजण म्हणायचे उद्धवजी, तुम्हीच येणार. जे काही सर्व्हे सुरू होते त्यात जनतेच्या मनातील मुख्यमंत्री कोण होता, मग त्याची दांडी कशी उडाली असे उद्धव ठाकरेंनी विचारले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR