पुणे : पुणे लोकसभेसाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पुणे लोकसभेची तयारी जोरात सुरू आहे. मनसे नेते आणि राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना पुणे लोकसभेची जबाबदारी दिली आहे. यामुळे अमित ठाकरे यांचे पुणे दौरे वाढले आहेत.
मनसेतून वसंत मोरे आणि साईनाथ बाबर या दोघांनी उघडपणे आपली लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. तसेच नुकतेच राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी या निवडणुकीसंदर्भात संकेत दिले होते. त्यांनी म्हटले होते की, साईनाथ बाबर यांना मला वरच्या पदावर पहायचे आहे. त्यांना आता महापालिकेत पाठवायचे नाही. त्यांना दिल्लीत पाठवले तर दुधात साखर पडेल. यामुळे मनसेत साईनाथ बाबर यांचा दावा मजबूत झाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून वसंत मोरे मनसेत नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. या सर्व चर्चांच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी वसंत मोरे यांनी अचानक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख नेते शरद पवार यांची भेट घेतली. पुणे येथील निसर्ग मंगल कार्यालयात वसंत मोरे यांनी शरद पवार यांची भेट झाली. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. यामुळे नाराज असलेले वसंत मोरे राष्ट्रवादी शरद पवार गटात जाणार की काय? अशी चर्चा सुरू झाली आहे.
भेटीनंतर काय म्हणाले वसंत मोरे
शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर वसंत मोरे यांच्याशी माध्यमांनी संवाद साधला. यावेळी ही राजकीय भेट नव्हती, असे त्यांनी स्पष्ट केले. आपण नाराज असल्याच्या बातम्या माध्यमांमधून येत आहेत. परंतु माझ्या चेह-यावर तुम्हाला कुठे नाराजी दिसत आहे का? मी शरद पवार यांच्या भेटीसाठी मतदार संघातील कामासाठी आलो होतो. माझ्या खडकवासला मतदारसंघाचा प्रश्न होता.