27.5 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeमहाराष्ट्रमनसेचे नेते फडणवीसांच्या भेटीला; युतीच्या चर्चांना उधाण

मनसेचे नेते फडणवीसांच्या भेटीला; युतीच्या चर्चांना उधाण

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्याच्या राजकारणात महत्त्वाच्या घडामोडी सुरू आहेत. राज्यात महायुतीचे सरकार आहे. त्यात तीन पक्ष आहेत. भाजपला शिंदेंच्या शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीची भक्कम साथ आहे. त्यात आता भाजप आणि मनसे युतीच्या चर्चांनी जोर धरला आहे. मनसेच्या महत्त्वाच्या नेत्यांनी भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात गुप्त बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे.

मनसेचे नेते संदीप देशपांडे, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. भेटीमागचं नेमकं कारण दोन्ही बाजूंकडून सांगण्यात आलेलं नाही. गेल्या काही दिवसांमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ब-याचदा एका व्यासपीठावर दिसले. तेव्हाही युतीची चर्चा रंगली. भाजपच्या नेत्यांनीही राज यांची अनेकदा भेट घेतली.

आता मनसेच्या तीन नेत्यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. त्यामुळे युतीच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या. फडणवीसांसोबत बैठक झाल्याचे देशपांडे यांनी मान्य केले आहे. संदीप देशपांडे, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई यांनी फडणवीसांची भेट घेतली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेली ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.

फडणवीसांसोबतची बैठक सदिच्छा भेट होती असे संदीप देशपांडे यांनी माध्यमांना सांगितले. आमच्यात विशेष अशी काही चर्चा झालेली नाही. ब-याच दिवसांपासून फडणवीसांना भेटायचे होते. त्यादृष्टीने आम्ही तिघांनी त्यांची भेट घेतली. ही सदिच्छा भेट होती. पुढेही असे प्रसंग आल्यास अशा सदिच्छा भेट नक्कीच होतील. एखाद्या व्यक्तीला भेटल्यास त्याचा काहीतरी अर्थ काढणे गरजेचे नाही. भेटीगाठी घेणं महाराष्ट्राचा इतिहास आहे. फडणवीसदेखील राज ठाकरेंना येऊन भेटतात. त्यामुळे आम्हीही त्यांना भेटलो, असे देशपांडे म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR