34.9 C
Latur
Thursday, April 25, 2024
HomeFeaturedमहायुतीच्या गाडीला मनसेचे ‘इंजिन’!

महायुतीच्या गाडीला मनसेचे ‘इंजिन’!

अमित ठाकरे दक्षिण मुंबईत तर शिर्डीत बाळा नांदगावकर यांना उमेदवारी शक्य

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात नवनवी राजकीय समीकरणे उदयास येत असल्याचे चित्र आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज नवी दिल्ली येथे भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेत चर्चा केल्याने निवडणुकीआधी राज ठाकरेंचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष महायुतीत सामील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दिल्लीतील भेटीगाठीनंतर राज ठाकरे मुंबईत येताच मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी राज यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेत चर्चा केली. या भेटीनंतर बाळा नांदगावकर यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देत महायुतीतील संभाव्य प्रवेशाबाबत भाष्य केले आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी आज (मंगळवारी) अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीत लोकसभा निवडणुकीबाबत सकारात्मक चर्चा झाली. पुढील दोन दिवसांत युतीबाबत अंतिम निर्णय होऊ शकतो, अशी माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली आहे. मनसेला महायुतीकडून ज्या जागा मिळतील त्यातील एका जागेवर बाळा नांदगावकर हे उमेदवार असू शकतात, याबाबतही नांदगावकर यांनी खुलासा केला आहे.

स्वत:च्या उमेदवारीबद्दल बोलताना बाळा नांदगावकर म्हणाले की, मी याआधी दोनदा दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आहे. आता राज ठाकरेंनी सांगितले तर मी गडचिरोलीतूनही निवडणूक लढवू शकतो. आम्हाला कानावर आदेश पडला की त्यानुसार कृती करण्याची सवय आहे. त्यामुळे राज ठाकरे जो आदेश देतील, त्यानुसार निर्णय घेऊ, अस्े नांदगावकर यांनी सांगितले आहे.

मनसेला कोणत्या जागा मिळणार?
राज ठाकरे यांच्या मनसेला महायुतीत दोन जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यात प्रामुख्याने मुंबईतील दक्षिण मुंबई हा मतदारसंघ मनसेला मिळेल. मनसेला मिळणारी दुसरी जागा ही ग्रामीण भागातील असू शकते. नगर जिल्ह्यातील शिर्डी मतदारसंघात मनसेला ताकद देण्याचा महायुतीचा प्रयत्न आहे. शिर्डीतून मनसेचे बाळा नांदगावकर यांना मैदानात उतरवण्याबाबत विचार सुरू आहे. तर दक्षिण मुंबईत उच्चशिक्षित आणि तरुण चेहरा असलेले अमित ठाकरे हे उभे राहावेत अशी भाजपाची मागणी होती. त्यामुळे या मतदारसंघात ठाकरे घराण्यातील दुसरी व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR