34 C
Latur
Friday, May 10, 2024
Homeसंपादकीय विशेषनवीन व्यापार कराराचे महत्त्व

नवीन व्यापार कराराचे महत्त्व

भारत आणि चार युरोपीय देशांचा गट युरोपीय फ्री ट्रेड असोसिएशन (इएफटीए) ने गुंतवणूक आणि वस्तू तसेच सेवा क्षेत्रात दोन्ही बाजूंकडील व्यापाराला प्रोत्साहन देण्यासाठी मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी केली आहे. भारताला निर्यात वाढविण्याच्या दृष्टीने ऑस्ट्रेलिया आणि संयुक्त अरब अमिरातीशी केलेले व्यापारी करार फायदेशीर ठरत आहेत. त्याचप्रमाणे ‘इएफटीए’ देशांशी केलेला करार देखील निर्यात आणि जागतिक बाजार वाढविण्याच्या दृष्टीने मैलाचा दगड सिद्ध होईल. या करारानंतर भारत आता ओमान, ब्रिटन, कॅनडा, दक्षिण आफ्रिका, अमेरिका, इस्रायल, गल्फ कंट्रीज कॉन्सिल, युरोपीय संघाच्या संभाव्य ‘एफटीए’ ला देखील तातडीने अंतिम रूप देईल.

दहा मार्च रोजी भारत आणि चार युरोपीय देशांचा गट युरोपीय फ्री ट्रेड असोसिएशन (इएफटीए) ने गुंतवणूक आणि वस्तू तसेच सेवा क्षेत्रात दोन्ही बाजूंकडील व्यापाराला प्रोत्साहन देण्यासाठी मुक्त व्यापार करारावर (एफटीए) स्वाक्षरी केली आहे. यास व्यापार आणि आर्थिक करार (टीइपीए) असे म्हटले आहे. ‘एफटीए’नुसार ‘इएफटीए’ संघटना पुढील १५ वर्षांसाठी भारतात शंभर अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्यास बांधील आहे. विकसित देशांचा समावेश असणा-या समूहाशी करार करण्याची भारताची पहिलीच वेळ आहे. ‘इएफटीए’च्या सदस्य देशांत आईसलँड, स्वित्झर्लंड, नॉर्वे आणि लिंकर्टेस्टाईन यांचा समावेश आहे. करारातील चौदा तरतुदींत वस्तूंचा व्यापार, शोधांचे नियम, संशोधन आणि नावीन्यता, बौद्धिक संपदा अधिकार (आयपीआर), सेवा क्षेत्रातील व्यापार, गुंतवणूक प्रोत्साहन, सहकार्य सरकारी खरेदी, व्यापारातील तांत्रिक अडथळे दूर करणे, व्यापारी सुविधा यांचा समावेश आहे. यामुळे भारतात दहा लाख प्रत्यक्ष रोजगारांची निर्मिती होईल. प्रामुख्याने करारात गुंतवणुकीवर अधिक भर देण्यात आला आहे.

चार युरोपीय देशांशी होणा-या भारताच्या एकूण व्यापारात स्वित्झर्लंडचा वाटा ९० टक्क्यांपेक्षा अधिक आहे. या कराराच्या माध्यमातून परदेशातील डिजिटल व्यापार, बँकिंग, आर्थिक सेवा, फार्मास्युटिकल्स, टेक्सटाईल यासारख्या क्षेत्रात भारताला शिरकाव करणे सहज शक्य होणार आहे. कृषी, दुग्धोत्पादन, सोयाबीन, कोळसा सेक्टरला या करारापासून दूर ठेवले. त्याचबरोबर ‘पीएलआय’ योजनेशी संबंधित असलेल्या सेक्टरसाठीही भारतीय बाजारपेठ खुली केली नाही. ग्रीन आणि विंड एनर्जी, फार्मा, फुड प्रोसेसिंग, केमिकल्ससह उच्च गुणवत्ता असणा-या मशिनरीच्या क्षेत्रात ‘इएफटीए’ देश भारतात गुंतवणूक करतील आणि त्यामुळे या सेक्टरमधील आपली आयात कमी राहील व उत्पादनाची गुणवत्ता वाढण्यास मदत मिळेल. नव्या करारानुसार स्वित्झर्लंडचा समावेश झाल्याने भारतात लोकप्रिय असणारे स्विस चॉकलेट, घड्याळ आणि बिस्किट हे वाजवी दरात मिळतील. करारानुसार या वस्तूंवर सध्या आकारले जाणारे आयात शुल्क पुढील सात वर्षांत टप्प्याटप्प्याने बंद केले जाणार आहे. दरवर्षी या शुल्कात कपात होत राहील. त्याचवेळी या करारामुळे इएफटीए देशांच्या विकासासाठी भारताचा मोठा बाजार उपलब्ध झाला आहे.

भारतीय कंपन्या आपल्या पुरवठा साखळीत वैविध्यपणा आणण्याचा प्रयत्न करतील. वास्तविक भारत आणि इएफटीए देश करारासाठी पंधरा वर्षांपेक्षा अधिक काळांपासून चर्चा करत होते. २०१३ च्या शेवटी चर्चा थांबली होती. २०१६ रोजी चर्चा पुन्हा सुरू झाली आणि हा करार आता प्रत्यक्षात येत आहे. हा व्यापारी करार बाजारात मुक्त, निष्पक्ष, समानता आणणारा आहे. या माध्यमातून भारत आणि इएफटीए देश आर्थिकदृष्ट्या परस्पर पूरक होतील. अर्थात ‘इएफटीए’ देश हे युरोपीय संघाचा भाग नाहीत, हे लक्षात घ्या. मुक्त व्यापाराला चालना देण्यासाठी ही एक सरकार अधिनस्त संघटना आहे. ज्यांना युरोपीय समुदायात सामील व्हायचे नाही, अशा देशांसाठी ही पर्यायी संस्था म्हणून समोर आली. सध्याच्या काळात भारत हा जागतिक पातळीवर नेतृत्व करणारा देश म्हणून नावारूपास येत आहे. अशावेळी अनेक विकसित आणि विकसनशील देश भारतासमवेत मुक्त व्यापार करारासाठी उत्सुक आहेत. भारताची अर्थव्यवस्था वेगाने विकसित होत आहे. जगात सर्वाधिक तरुण भारतात आहेत आणि सर्वाधिक कौशल्य प्रशिक्षण संस्था, वाढते सेवा क्षेत्र, वाढते निर्यात क्षेत्र आणि बा परिस्थितीने अर्थव्यवस्थेला बसणा-या धक्क्यांना सहन करण्याची विकसित झालेली क्षमता ही नव्या भारताची पायाभरणी आहे. अनिवासी भारतीयांकडून दरवर्षी मायदेशी निधी पाठविण्याचा ओघ वाढला आहे तसेच तंत्रज्ञान विकासाला देखील मदत मिळत आहे. या सर्व गोष्टी भारताला नव्या एफटीएमध्ये संधी निर्माण करण्यासाठी मोलाच्या ठरत आहेत.

मुक्त व्यापार करारामुळे भारताला निम्न मध्यम ते उच्च मध्यम गटातील देश होण्यास मदत मिळत आहे. काही दिवसांपूर्वी जागतिक क्रेडिट रेटिंग एजन्सी क्रिसिलने आपल्या अहवालातील, भारत हा आर्थिक, वित्तीय आणि रचनात्मक सुधारणांमुळे २०३१ पर्यंत उच्च मध्यम गटातील देश होऊ शकेल, असे म्हटले आहे. तसेच २०२३-२४ या आर्थिक वर्षात भारताचा जीडीपी वाढीचा दर ७.६ टक्के आहे आणि तो २०२४-२५ मध्ये ६.८ टक्के राहण्याची शक्यता वर्तविली आहे. भारत ३.६ लाख कोटी डॉलरच्या जीडीपीसह जगातील पाचव्या क्रमाकांची अर्थव्यवस्था आहे. भारतापुढे अमेरिका, चीन, जपान आणि जर्मनी देश आहेत. २०३०-३१ पर्यंत भारतीय अर्थव्यवस्थेचा आकार ६.७ लाख कोटी डॉलरपर्यंत पोचेल आणि त्यावेळी भारतातील प्रति व्यक्तीचे उत्पन्न वाढत ४५०० डॉलरपर्यंत पोचेल तसेच भारत उच्च-मध्यम उत्पन्न गटातील देशांच्या समूहात सामील होईल. सध्याची जागतिक मंदी, इस्रायल-पॅलेस्टाईन युद्ध, रशिया-युक्रेन युद्धाच्या काळात भारताने काही गोष्टींचे आकलन केले. निर्यातक्षम होण्यासाठी ‘इएफटीए’नंतर आता अन्य विविध देशांसाठी देखील व्यापारी करारासंदर्भात चर्चा वाढवावी लागणार आहे.

भारताला निर्यात वाढविण्याच्या दृष्टीने ऑस्ट्रेलिया आणि संयुक्त अरब अमिरातीशी केलेले व्यापारी करार फायदेशीर ठरत आहेत. त्याचप्रमाणे ‘इएफटीए’ देशांशी केलेला करार देखील निर्यात आणि जागतिक बाजार वाढविण्याच्या दृष्टीने मैलाचा दगड सिद्ध होईल. परिणामी निर्यात वाढेल आणि व्यापक प्रमाणात रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील. ‘इएफटीए’नंतर भारत आता ओमान, ब्रिटन, कॅनडा, दक्षिण आफ्रिका, अमेरिका, इस्रायल, गल्फ कंट्रीज कॉन्सिल, युरोपीय संघाच्या संभाव्य ‘एफटीए’ ला देखील तातडीने अंतिम रूप देईल. मुक्त व्यापार कराराच्या शक्तीनिशी भारत दमदार वाटचाल करेल. या पार्श्वभूमीवर जागतिक आर्थिक संघटनेच्या अहवालानुसार, भारत हा २०२७ मध्ये जगातील तिस-या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून नावारूपास येऊ शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशानुसार तयार केलेला ‘विकसित भारत २०४७’ च्या आरखड्याच्या अजेंड्यानुसार ८ ते ९ टक्के विकासदरांसह भारत विकसित देशाच्या दिशेने मार्गक्रमण करेल.

-डॉ. जयंतिलाल भंडारी, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR