23.3 C
Latur
Tuesday, December 24, 2024
Homeमहाराष्ट्रभाजपशी ‘मनसे’ची छुपी युती; शिंदेसेनेची मात्र कोंडी!

भाजपशी ‘मनसे’ची छुपी युती; शिंदेसेनेची मात्र कोंडी!

मुंबई : विशेष प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची छुपी युती झाल्याची चर्चा आहे. मनसे प्रमुख राज ठाकरेंची गेल्या काही दिवसांमधील विधाने, त्यांनी दिलेले आणि न दिलेले उमेदवार यावरून उपरोक्त शंका उपस्थित केली जात आहे. त्यामुळे मनसे आणि भाजपचं नेमकं चाललंय काय, अशी चर्चा सुरु झाली आहे. राज ठाकरेंना ताकद देऊन भाजप शिंदेंना नियंत्रणात ठेवतोय का, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

विधानसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज माघारी नंतर राज्यभरातील लढतींचं चित्र स्पष्ट झालं. मुंबईतील ३६ जागांपैकी २५ जागांवर मनसेनं उमेदवार दिले आहेत. महायुतीत यापैकी १० जागा भाजप, तर १२ जागा शिंदेसेना लढवत आहे. विशेष म्हणजे भाजपच्या बड्या नेत्यांना, त्यातही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी जवळीक असलेल्या नेत्यांविरोधात मनसेने उमेदवार दिलेले नाहीत.

भाजप आमदार राहुल नार्वेकर (कुलाबा), मंगलप्रभात लोढा (मलबार हिल), आशिष शेलार (वांद्रे पश्चिम), विनोद शेलार (मालाड पश्चिम), मिहीर कोटेचा (मुलुंड), तमिल सेल्वन (सायन-कोळीवाडा) यांच्याविरोधात मनसेने उमेदवार दिलेले नाहीत. या नेत्यांना राज ठाकरेंकडून एकप्रकारे बाय देण्यात आलेला आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये.

महायुतीचं सरकार पुन्हा येईल आणि भाजपचा मुख्यमंत्री होईल, असं विधान राज यांनी गेल्याच आठवड्यात एका मुलाखतीत केलं. याच मुलाखतीत त्यांनी मला मिळालेलं निवडणूक चिन्ह कोर्टानं दिलेलं नाही. ते मतदारांमुळे मला मिळालंय. मी ते ढापलेलं नाही, असं म्हटलं. डोंबिवलीतल्या भाषणातही त्यांनी पक्ष, चिन्हावरुन मुख्यमंत्री शिंदेंचा समाचार घेतला. पण त्यांनी भाजपवर टीका करणं टाळलं. त्यामुळे मनसे, भाजपमध्ये नेमकं काय शिजतंय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR