धाराशिव : प्रतिनिधी
धाराशिव जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील जेवळी येथे जिन्स पॅन्टच्या खिशात ठेवलेल्या मोबाईलचा अचानक स्फोट झाला आणि एकच खळबळ उडाली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झालेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना धाराशिवच्या गुरु सिद्धेश्वर विरक्त मठात घडली आहे. या मठात गुरुपौर्णिमा महोत्सवाच्या नियोजनासाठी बैठक सुरु होती. बैठक सुरू असताना दक्षिण जेवळी येथील सोमनाथ वसंत गुंजोटे यांच्या खिशातून अचानक धूर निघू लागला आणि क्षणातच मोबाईलचा स्फोट झाला.
प्रसंगावधान राखत त्यांनी जळत असलेला मोबाईल तातडीने खिशातून बाहेर फेकल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र या घटनेत त्यांच्या कपड्यांना आग लागून शर्ट व पॅन्टचा काही भाग जळाला असून हाताच्या बोटाला आणि मांडीला किरकोळ इजा झाली आहे.
उपस्थित नागरिकांनी तात्काळ आग विझवत त्यांना स्थानिक दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. प्राथमिक अंदाजानुसार, हा स्फोट फोनच्या अति वापरामुळे किंवा मोबाईलमधील बॅटरी गरम झाल्यामुळे झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
















