नवी दिल्ली : पहलगाम हल्ल्यानंतर भारताने विविध मार्गाने पाकिस्तानच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली असून त्याचाच एक भाग म्हणून गृह मंत्रालयाने बुधवारी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना ‘मॉक ड्रिल’ करण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे देशभरात २५९ ठिकाणी ‘मॉक ड्रिल’ अर्थात युद्ध सराव करण्यात आला असून यामध्ये महाराष्ट्रातील १७ ठिकाणांचा समावेश होतो.
महाराष्ट्रातील मुंबई, उरण, तारापूर, ठाणे, पुणे, नाशिक, रोहा, नागोठणे, मनमाड, सिन्नर, थळ, पिंपरी चिंचवड, छत्रपती संभाजीनगर, भुसावळ, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे युद्ध सराव (मॉक ड्रिल) करण्यात आला आहे. देशाच्या सीमेवर असलेल्या राजस्थान, पंजाब, जम्मू-काश्मीर, पश्चिम बंगाल आणि ईशान्य भारतातील राज्यांच्या अनेक शहरांत युद्धसराव केल्या गेला आहे. महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी ‘मॉक ड्रिल’ यशस्वीपणे पार पडला आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये संबंध ताणले असून केंद्रीय गृह मंत्रालयाने काही राज्यांना स्वसंरक्षणासाठी सराव करण्याचे निर्देश दिले होते. देशभरातील एकूण २५९ ठिकाणी ७ मे रोजी युद्धसराव केला जाणार असल्याची माहिती दोन दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आली होती. या सरावातून हवाई हल्ला झाल्यास इशारा देणा-या भोंग्यांची चाचणी तसेच अशा स्थितीत नागरिकांनी स्वत:चा बचाव कसा करावा, याबाबत प्रशिक्षण देण्यात आले आहे. याशिवाय ‘क्रॅश ब्लॅकआऊट’ (मोठ्या प्रदेशात एकाच वेळी अंधार करणे), महत्त्वाच्या आस्थापनांच्या संरक्षणासाठी ‘कॅमोफ्लॉज’, तातडीने स्थलांतर करावे लागल्यास त्याची तयारी आणि सराव आदीचा समावेश करण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली आहे.
संपूर्ण भारतातील २५९ ठिकाणी तीन श्रेणींमध्ये ‘मॉक ड्रिल’ पार पडला असून पहिल्या श्रेणीत देशभरातील संवेदनशील अशी १३ शहरे, दुस-या श्रेणीत २०१ आणि तिस-या श्रेणीत ४५ शहरे होते. महाराष्ट्रात मुंबई, उरण आणि तारापूर हे प्रथम श्रेणीत आहे. मुंबई हे भारताचे प्रमुख आर्थिक केंद्र आहे, तर उरण येथे माल वाहतूक करणारे जेएनपीटी बंदर आहे. तारापूर येथे अणुऊर्जा प्रकल्प असल्यामुळे या तीनही ठिकाणांचा समावेश संवेदनशील श्रेणीत करण्यात आला असावा, असा अंदाज आहे.
मॉक ड्रिल कसे झाले?
गृह खात्याच्या अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा युद्धसराव संघर्षाचे संकेत नसून नागरी संरक्षण कायदा, १९६८ यानुसार शीतयुद्धाच्या काळात संभाव्य धोक्यापासून नागरिकांचे संरक्षण करण्यासाठीचा नियमित असा सराव होता. युद्धाची परिस्थिती उद्भवल्यास आपण त्यासाठी किती तयार आहोत, हे यातून दिसले आहे. ७ मे रोजी ठरलेल्या शहर, जिल्ह्यात राज्य आणि जिल्हा यंत्रणेच्या समन्वयातून युद्धसराव केल्या गेला. सिव्हिल डिफेन्स वॉर्डन्स, होम गार्ड, एनसीसी कॅडेट, एनएसएस स्वयंसेवक, नेहरू युवा केंद्र संघटनचे स्वयंसेवक आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना या सरावासाठी सामावून घेण्यात आले होते. युद्धसरावादरम्यान वीज खंडित होणे, ब्लॅकआऊट, मोठ्या आवाजातील सायरन ऐकू आले. काही ठिकाणी सार्वजनिक जागांवर प्रवेशबंदी करण्यात आली होती. तर काही शहरांमध्ये वाहतूक वळवण्यात आली होती.