23 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्र४० मतदान केंद्रांवर होणार ‘मॉकपोल’

४० मतदान केंद्रांवर होणार ‘मॉकपोल’

निवडणूक आयोगाचे आदेश सुजय विखेंनी घेतला होता आक्षेप

नगर : प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागलेल्या सुजय विखे पाटील यांनी काही मतदान केंद्रांवर गैरप्रकार झाल्याचा आरोप केला होता. त्यानुसार या केंद्रांवरील मतांची पुन्हा मोजणी करण्याची मागणी त्यांनी निवडणूक आयोगाकडे केली होती. या पार्श्वभूमीवर आक्षेप घेण्यात आलेल्या या ४० मतदान केंद्रांवर मॉकपोल घेण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने जिल्हा निवडणूक आयोगाला दिल्या आहेत.

त्यामुळे आता या आक्षेप घेण्यात आलेल्या बुथवरील ईव्हीएमची मेमरी रिकामी करून मतांची पडताळणी केली जाणार आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्देशांमुळे विखेंसाठी हा दिलासा मानला जात आहे. पण या तपासातून काय समोर येते हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

४ जूनला मतमोजणी पार पडल्यानंतर १० जून रोजी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील ४० मतदान केंद्रांवरील ईव्हीएम मशिनची आणि व्हीव्हीपॅटची पडताळणी व्हावी असा अर्ज पराभूत उमेदवार सुजय विखे पाटील यांनी निवडणूक आयोगाकडे केला होता. या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला काल एक पत्र लिहून पुढील कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार इथे आता मॉकपोल होणार आहे. पण आता ही प्रक्रिया नेमकी कधी पार पडते हे पहावं लागणार आहे.

अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही अत्यंत प्रतिष्ठेची झाली होती. यामध्ये एकीकडे भाजपचे विद्यमान सुजय विखे पाटील आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार निलेश लंके यांच्यामध्ये लढत झाली होती. यामध्ये निलेश लंके यांचा अवघ्या २९ हजार मतांनी विजय होऊन ते खासदार बनले होते.

असा होणार मॉकपोल
आक्षेप घेण्यात आलेल्या ४० ईव्हीएम मशिनची मेमरी रिकामी करणार
एका मशिनमध्ये प्रत्येकी १ ते १४०० मतं टाकता येणार
किती मतं द्यायची हे ठरवण्याचे अधिकार उमेदवारांना असणार आहेत.
व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएम मशिनवरील मतांची पडताळणी होणार
ही संपूर्ण प्रक्रिया सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली पार पडणार.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR